वैद्यकीय कारणासह अंत्यसंस्कारांसाठी मागितला ‘ई-पास’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:09 AM2021-05-05T04:09:15+5:302021-05-05T04:09:15+5:30
तब्बल ३६ हजार अर्ज; कागदपत्रांंअभावी २६ हजार ९२६ रद्द मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या ...
तब्बल ३६ हजार अर्ज; कागदपत्रांंअभावी २६ हजार ९२६ रद्द
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी २३ एप्रिलपासून ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांकडे ई-पाससाठी ३६ हजार ४०५ अर्ज आले. यात वैद्यकीय आणि अंत्यसंस्कारासाठीची सर्वाधिक कारणे दिसून आली. मात्र, कागदपत्रांच्या पडताळणीअंती यापैकी फक्त ९ हजार ४७९ अर्ज मंजूर करीत ई-पास देण्यात आले.
मुंबईसह राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले असतानाही नागरिक मोठ्या संख्येने खासगी वाहनांसह घराबाहेर पडताना दिसत आहेत. मुंबईत तपासणी दरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून कलर कोडिंग सिस्टम लागू करण्यात आली. मात्र त्याचाही नागरिक गैरफायदा घेऊ लागल्यामुळे पोलिसांवर ताण वाढला. त्यामुळे अवघ्या आठवड्याभरात ही सिस्टीम बंद करण्यात आली. २२ एप्रिलपासून निर्बंध अधिक कडक करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यानुसार, २३ एप्रिलपासून आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला. यापूर्वीही ई-पास बंधनकारक करण्यात आला होता. वैद्यकीय आणि अंत्यसंस्काराची कारणे देत नागरिक ई-पाससाठी अर्ज करीत आहेत. काही ठिकाणी लग्नासाठीच्या कारणांचाही समावेश आहे.
मुंबई पोलिसांकडून वाशी, दहिसर, मुलुंड पूर्व आनंदनगर टोलनाका, पश्चिमेकडे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील टोलनाका तसेच ऐरोली अशा मुंबईच्या वेशीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करत वाहनांची झाडाझडती सुरू आहे. ई-पास नसणाऱ्यांंना पुन्हा मागे पाठविण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईबाहेर जाण्यासाठी अनेक जण खाेटी कारणे देऊन ई-पाससाठी अर्ज करीत असले तरी पुरेशी कागदपत्रे नसल्याने त्यांचा हा प्रयत्न फसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत ई-पाससाठी ३६ हजार ४०५ अर्ज आले. त्यापैकी अवघे ९ हजार ४७९ अर्ज मंजूर करण्यात आले. बहुतांश अर्ज कागदपत्रांंअभावी रद्द करण्यात आले.
..............................................
कारणे तीच..
‘ई-पास’साठी सर्वाधिक वैद्यकीय किंवा जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या कारणांचे प्रमाण अधिक आहे. त्यात लग्न समारंभासाठीच्याही अर्जांचा समावेश आहे.
...
ही कागदपत्रे हवीत
ई-पाससाठी तुमची वैयक्तिक माहिती, खासगी वाहनाने प्रवास करणार असल्यास त्याचा क्रमांक, पासची वैधता, क्यूआर कोड इत्यादी माहिती देणे गरजेचे आहे. ओळखपत्र, फिटनेस सर्टिफिकेट आणि ज्यासाठी जात आहोत, त्यासंबंधित कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.
....
तत्काळ प्रतिसाद..
ई-पासच्या संकेतस्थळावर अर्ज करताच ते विभागीय उपायुक्तांकडे जातात. तेथील पथक कागदपत्रांची पाहणी करत तत्काळ अर्ज स्वीकारते अथवा रद्द करते. तसेच ज्या कारणांमुळे अर्ज रद्द केला त्याचे कारणही त्यात नमूद करण्यात येते.
.....
‘ई-पास’ कसा काढायचा?
ई-पास काढण्यासाठी तुम्ही https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा.
संकेतस्थळावर ''apply for pass here'' पर्यायावर क्लिक केल्यानंतर, त्यात विचारलेल्या प्रश्नांबाबत माहिती भरावी लागेल.
त्यामध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कुठे प्रवास करायचा आहे ते निवडा.
आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
प्रवास कोणत्या कारणासाठी करीत आहात याची माहिती द्या.
कागदपत्रांची माहिती एकत्रित घेऊन ती अपलोड करा.
तुम्ही अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी मिळेल. तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही? तसेच ई-पास काढण्यासाठी तो टोकन आयडी गरजेचा आहे. टोकन आयडी टाकून साइटवरून ई-पास डाऊनलोड करता येतो.
.....