लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मोबाइलवर क्रिकेटची मॅच पाहत शिवनेरी बस चालविणाऱ्या ड्रायव्हरला राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) बडतर्फ केले, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार कंत्राटदार कंपनीला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
एसटीने भाडेतत्त्वावर घेतलेल्या खासगी गाड्यांना वारंवार अपघात होतात. बऱ्याचदा ड्रायव्हरचा निष्काळजीपणा त्यास कारणीभूत ठरतो. असाच एक प्रकार शनिवारी, २२ मार्चला संध्याकाळी ७ वाजता दादरवरून स्वारगेटला निघालेल्या ई-शिवनेरी बसमध्ये घडला. एसटीचा चालक रात्री लोणावळ्याजवळ स्टेअरिंगवर मोबाइल ठेवून क्रिकेट मॅच पाहत बस चालवत होता. त्याची चित्रफीत बसमधील प्रवाशांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवली. सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले.
...तरच प्रवाशांचा विश्वास दृढ होईल
ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई-पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बससेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करीत असतात. “अपघातविरहित सेवा” असा या बससेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेवरील विश्वास दृढ होत जाईल, असे परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले.
एसटीच्या खासगी बसचालकांना संबंधित कंत्राटदार संस्थेने शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण वेळोवेळी देणे आवश्यक आहे. खासगी अथवा प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा, टॅक्सीचालकही हेडफोन घालून गाडी चालवत मोबाईलवर मॅच अथवा चित्रपट पाहत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या संदर्भात परिवहन विभाग नवी नियमावली जारी करणार आहे. -प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री