केडीएमसीचे महिलांसाठी ई टॉयलेट
By admin | Published: March 30, 2016 01:45 AM2016-03-30T01:45:12+5:302016-03-30T01:45:12+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका आता महिलांसाठी ई-टॉयलेट उभारणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती स्थायी समिती
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका आता महिलांसाठी ई-टॉयलेट उभारणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी दिली.
‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’ पुरवणीत महिलांसाठी प्रसाधनगृहे अपुरी आहेत. सध्या असलेली प्रसाधनगृहे गैरसोयींच्या ठिकाणी आहेत. तसेच त्यात स्वच्छता व पाणी नसते. त्यामुळे महिलांची कुचंबणा होते, यावर प्रकाश टाकण्यात आला होता. या वृत्ताची दखल घेत गायकर यांनी यंदाच्या अर्थ संकल्पात महिलांसाठी ई-टॉयलेट उभारण्याचे ठरविले. त्यासाठी एक कोटीची तरतूद केली आहे. यापूर्वी तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी जेंडर बजेटची संकल्पना मांडली होती.
महिलांसाठी विशेष काम करण्यासाठी विशेष निधीची तरतूद केली होती. हा निधी त्याच कामासाठी खर्च झाला नाही. त्यामुळे त्यांची जेंडर बजेटची कल्पना फारशी पूर्णत्वास आली नाही. मात्र त्यांचा प्रयत्न चांगला होता. त्यांच्या नंतर आलेल्या प्रशासकांनी जेंडर बजेटला बगल देण्याचा प्रयत्न केला असला तरी गायकर यांनी ई-टॉयलेटसाठी पुढाकार घेतला आहे.
ई-टॉयलेट विषयी ...
१)एका ई-टॉयलेटची किंमत साडेतीन लाख ते साडेआठ लाखा रुपयांपर्यंत आहे.
२)केरळमध्ये दोन हजार ई-टॉयलेट आहेत. तर देशातील इतर शहरांमध्ये आठ हजार ई-टॉयलेट आहेत.
३)‘पे अॅण्ड यूज’च्या धर्तीवर त्यांचा वापर केला जातो. एक रुपयांचे नाणे टाकल्यानंतर या प्रसाधनगृहांचा वापर करता येईल.
४)या टॉयलेटसाठी ४५ चौरस फूट इतकी कमी जागा लागते. पाचशे लिटर पाणी त्यात साठविलेले असते. तसेच एका वेळेस दीड लिटर पाण्याचा वापर होतो. त्यामुळे ई टॉयलेट स्वच्छ व युजर फ्रेंण्डली असतात.
५) किमान किंमत असलेली ई- टॉयलेट स्टेशन परिसर, बस डेपो आणि शहराच्या मुख्य चौकात ठेवायची झाल्यास एक कोटी रुपयांच्या तरतूदीनुसार ३० ठिकाणी ही टॉयलेट्स बसवता येतील.