E-Water Taxi : मुंबई : मुंबईकरांसाठी एक खूशखबर आहे. आता देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे. जेएनपीटी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ही सेवा लाभदायी ठरणार आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) आणि जेएनपीटी यांच्यातील करारानंतर ही सेवा पुढील महिन्यापासून नियमितपणे सुरू केली जाणार आहे. हा एक नवीन वाहतूक पर्याय असणार आहे, जो मुंबईतील वाढती वाहतूक समस्या सोडवण्यास मदत करू शकेल. जलमार्गांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल म्हटले जात आहे.
मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. त्यावर उपाय म्हणून जलमार्गाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी यापूर्वीही वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यायाने महागड्या तिकीट दरांमुळे या सेवांना मुंबईकरांनी प्रतिसाद दिला नाही. याच पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची सेवा समोर आली आहे. ही सेवा किफायतशीर आणि पर्यावरणासाठी फायदेशीर देखील ठरणार आहे.
सुरुवातीला ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी परदेशातून आणण्याचा विचार होता. मात्र, माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने (एमडीए) स्वत:च इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार करण्याचा निर्णय घेतला. तसेच, इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची निर्मितीही यशस्वी पूर्ण केली आहे. दरम्यान, एमडीएलने दोन इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार केल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची खासियत काय?या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची लांबी १३.२७ मीटर आहे, तर रुंदी ३.०५ मीटर आहे. या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची आसन क्षमता २५ प्रवशांची आहे. तसेच, यामध्ये ६४ किलोवॅटची बॅटरी आहे. ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी एकदा चार्जिंग केल्यावर ४ तास चालू शकते. टॅक्सीचा वेग १४ नॉट्सपर्यंत असणार आहे. याशिवाय, या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीत वातानुकूलित सुविधा (Air-conditioned facility) उपलब्ध असणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.