प्रत्येक मेडिकल कॉलेज ३५० बेड तयार करणार; १५ ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:09 AM2021-07-14T09:09:38+5:302021-07-14T09:11:30+5:30
कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगरचा ग्रामीण भाग या ठिकाणची साथ संपलेली नाही.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभाग पूर्णपणे ऑनलाईन करणे हे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे मिशन आहे. त्यादृष्टीने एमबीबीएस, पीजीचे विद्यार्थी तसेच कार्यालयीन फायलींचा प्रवास ऑनलाईन करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. सातारा, सिंधुदुर्ग, अलिबाग आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याच्या कामांना गती दिली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. संचालक झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी ‘लोकमत’ला मुलाखत दिली आहे.
मिळालेल्या जागा नियमित करून घेणे, हे सध्या अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचे इन्स्पेक्शनचे काम बाकी आहे. कोविडमुळे हे काम थांबले होते. आता हे काम प्राधान्याने केले जाईल, ज्यामुळे या जागा आपल्याकडे कायम राहतील, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा धोका किती आहे? त्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाने काय तयारी केली आहे? युकेमध्ये सध्या तिसऱ्या लाटेचे ३२ हजार रुग्ण वाढले आहेत. तिकडे साथ आली, की दोन महिन्यांनंतर आपल्याकडे येते, असा अनुभव आहे. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे तिसऱ्या लाटेचा धोका संभवतो. त्यासाठी विभागाच्या सचिवांनी एक आढावा बैठक घेतली.
कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगरचा ग्रामीण भाग या ठिकाणची साथ संपलेली नाही. कोल्हापुरात कालही मोठ्या प्रमाणावर रुग्ण निघाले आहेत. त्यामुळेच त्या ठिकाणची साथ आटोक्यात आणणे महत्त्वाचे आहे. तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठीच्या बैठका आपणही घेत आहोत. प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मोठ्या रुग्णांसाठी २५० बेड आणि छोट्या रुग्णांसाठी १०० बेड तयार तयार ठेवा, अशा सूचना दिल्या आहेत. हे सगळे बेड ऑक्सिजनयुक्त असतील. १५ ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, ८ खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्व अभिमत वैद्यकीय विद्यापीठे यांना दिले आहेत.
आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. त्याविषयी नेमकी कोणती पावले उचलली जात आहेत? सार्वजनिक आरोग्य विभागात ज्याप्रमाणे संचालक आणि अधिकारी आहेत, त्याच पद्धतीने वैद्यकीय शिक्षण विभागात देखील संचालकांची पदे भरली जावीत. कामाचे नियोजन व्हावे, अशी कल्पना नुकतीच मंत्री देशमुख यांनी बैठकीत मांडली आहे. मनुष्यबळ वाढवण्याच्या त्यांच्या सूचना आहेत. त्यासाठी एकूण रिक्त जागा किती आहेत? त्या कशा पद्धतीने भरता येतील? पदोन्नतीच्या किती जागा रिक्त आहेत व त्या कशा भरता येतील?, यावर माहिती गोळा करणे सुरू झाले आहे.
आपल्याकडे १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. तरीही राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण मुंबईत येतात. हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जास्तीत जास्त सोयी सुविधा देणे, तेथील प्रश्न सोडवणे, त्या ठिकाणचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणे या गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांना त्यांच्या जवळच्या जिल्ह्यात उपचार मिळू शकतील. परिणामी जे. जे. रुग्णालयावर येणारा ताण कमी होईल. मुंबईत येऊन उपचार घेणे छोट्या शहरातील गोरगरीब रुग्णांना अशक्य असते. त्यामुळे विविध जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये मजबूत केली पाहिजेत, याकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे.