मतदारराजा कुणाला साथ देणार, याची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 02:42 AM2019-03-25T02:42:19+5:302019-03-25T02:42:31+5:30

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कलिना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस करत असले, तरी या मतदारसंघातील महापालिकेच्या प्रभागांमध्ये मात्र इतर पक्षांचे वर्चस्व आहे.

The eagerness of voters to co-operate with | मतदारराजा कुणाला साथ देणार, याची उत्सुकता

मतदारराजा कुणाला साथ देणार, याची उत्सुकता

Next

- खलील गिरकर

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कलिना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस करत असले, तरी या मतदारसंघातील महापालिकेच्या प्रभागांमध्ये मात्र इतर पक्षांचे वर्चस्व आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीतदेखील पोतनीस यांचा अवघ्या १ हजार २९७ मतांनी निसटता विजय झाला होता. शिवसेनेच्या पोतनीस यांना ३० हजार ७१५ मते मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे अमरजीत सिंग यांना २९ हजार ४१८ मते मिळाली होती. विशेष म्हणजे, २००९च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे कृपाशंकर सिंह यांना २०१४च्या निवडणुकीत २३ हजार ५९५ मते मिळून ते तृतीय क्रमांकावर राहिले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कप्तान मलिक हे १८ हजार १४४ मते मिळवून चौथ्या क्रमांकावर राहिले होते. या मतदारसंघात सध्या २ लाख ३२ हजार ३२९ मतदार आहेत.
कलिना मतदारसंघात शिवसेना व भाजपाची एकत्रित ताकद मोठ्या प्रमाणात आहे. भाजपा व शिवसेना यांची युती झाली असल्याने, या दोन पक्षांची एकत्रित ताकद वाढल्याचे चित्र कागदावर दिसत आहे. मात्र, दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन नेमके किती प्रमाणात झाले आहे, त्यावर त्यांचे यशापयश अवलंबून आहे. गेली पाच वर्षे एकमेकांना पाण्यात पाहण्यात व एकमेकांविरोधात राजकारण करण्यात शिवसेना व भाजपाची मंडळी कार्यरत असल्याने, ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीचा प्रभाव कितपत पडतो, यावर अनेक समीकरणे अवलंबून आहेत. भाजपाने या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत, युतीमधील घटक पक्षांशी संपर्क साधण्यासाठी विशेष पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
शिवसेनेत वरून आलेल्या आदेशाचे पालन केले जाते. त्यामुळे युती जाहीर होण्यापूर्वी कितीही मतभेद असले, तरी युती झाल्यानंतर संबंध सुरळीत होतात, यावर भाजपचादेखील विश्वास आहे. विधानसभा व महापालिका निवडणूक शिवसेना व भाजपा यांनी एकमेकांविरोधात लढविली होती. त्यामुळे आता नेमके किती मनोमिलन होते, त्यावर पुढील लढत अवलंबून आहे.
खासदार पूनम महाजन यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरील पद असल्याचा लाभ घेत, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमच्या कामावर आम्हाला मते मिळतील, असा विश्वास भाजपाला आहे.

राजकीय घडामोडी
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले व स्वतंत्र गट तयार केलेले कृपाशंकर सिंह गेल्या काही कालावधीपासून राजकारणात सक्रिय नाहीत. त्यांच्यावरील गुन्ह्यांच्या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांचा भाजपा प्रवेशाची चर्चा झाली होती. मात्र, सिंह अद्याप कोणत्याच पक्षात सक्रिय झालेले नाहीत.
केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याचा लाभ स्थानिक भाजपाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपा कार्यकर्ते कशा प्रकारे त्याचा लाभ घेतात, यावर या मतदारसंघातील जय-पराजय अवलंबून राहील.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत कलिना विधानसभा मतदारसंघात पूनम महाजन यांना ६६ हजार २५७ मते मिळाली होती, तर दुसºया क्रमांकावरील प्रिया दत्त यांना ४३ हजार ५५६ मतांवर समाधान मानावे लागले होते.
काँग्रेसचे दिंडोशी मतदारसंघाचे माजी आमदार व कलिनामधून नगरसेवक असलेले राजहंस सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा लाभदेखील भाजपाला होण्याची शक्यता आहे.

दृष्टिक्षेपात राजकारण
स्थानिक आमदार जास्त सक्रिय नसल्याची भावना विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे, तर मतदारसंघाचा विकास केल्याचा दावा सत्ताधाºयांकडून करण्यात येत आहे.
कलिना मतदारसंघात येणारा कुर्ला पश्चिम येथील भाग हा मुस्लीम बहुल आहे.
काँग्रेस आघाडीला मतदान होण्याची अपेक्षा आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाºया पूनम महाजन या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्याने व प्रमोद महाजन यांच्या कन्या असल्याने त्यांना मानणारा असा वर्गदेखील या मतदारसंघात आहे.
दुसरीकडे, प्रिया दत्त यांनादेखील सुनील दत्त यांचा वारसा असल्याने त्यांना मानणारा वर्गदेखील मतदारसंघात आहे. दोन्ही मातब्बर घराण्यातील पुढील पिढी रिंगणात असल्याने केवळ पक्ष नव्हे, तर व्यक्तिगत पातळीवरील संबंधांचा वापरदेखील या ठिकाणी पुन्हा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: The eagerness of voters to co-operate with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.