लाँग कोविडमुळे कान-नाक-घशाच्या समस्या,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:14+5:302021-08-17T04:12:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - कोविडमधून बरे होत असलेले अनेक रुग्ण अजूनही या आजारानंतरही दीर्घकाळासाठी रेंगाळत राहणाऱ्या लक्षणांचा, म्हणजेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविडमधून बरे होत असलेले अनेक रुग्ण अजूनही या आजारानंतरही दीर्घकाळासाठी रेंगाळत राहणाऱ्या लक्षणांचा, म्हणजेच ’लाँग कोव्हिड सिंड्रोम’चा सामना करत आहेत.
कोविड संसर्गाच्या सुरुवातीच्या काळानंतरही कित्येक आठवड्यांपर्यंत अनेक रुग्णांना श्वास न पुरणे, डोकेदुखी, तोंडाची चव जाणे, वास न येणे किंवा कमी येणे, व्हर्टायगो, गरगरणे, कफ, नाक भरणे, ऐकू न येणे किंवा कानात गुण्ण होत राहणे... ही व अशी कितीतरी लक्षणे जाणवत राहतात. अनेक रुग्णांना तर लाँग कोविड सिंड्रोम म्हणजे काय आणि त्याचा कान, नाक व घसा या लक्षणीय ज्ञानेंद्रियांवर कसा परिणाम होतो, हेही माहीत नसते. त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडते. त्यातून त्यांना नैराश्य येऊ शकते, अशी माहिती संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस यांनी दिली.
कोविडमुळे प्रामुख्याने नाक चोंदणे, घसा बसणे आणि वास जाणविण्याच्या प्रक्रियेत बिघाड होणे अशी श्वसनमार्गाच्या वरच्या भागाशी संबंधित लक्षणे उद्भवतात. यात श्वसनमार्गाच्या खालच्या भागाचाही समावेश असू शकतो. त्यातून कफ, श्वास घ्यायला त्रास होणे आणि छाती गच्च होणे अशी लक्षणे उद्भवू शकतात. सौम्य कोविड झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये ऑनोस्मिया (अजिबात वास न येणे), कॅकोस्मिया (गंधाची विपर्यस्त जाणीव, अवतीभोवती घ्राणेंद्रियांना उद्दिपित करणारे कारण असो वा नसो), हायपोस्मिया (गंधज्ञान कमी होणे) ही लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे काही आठवड्यांपर्यंत जाणवत राहतात, मात्र चार आठवड्यांहूनही जास्त काळ ही लक्षणे दिसत राहिल्यास अशा रुग्णाने याबाबतची माहिती डॉक्टरांना द्यायला हवी, असे डॉक्टरांनी नमूद केले.
वास न येण्याबरोबरच नीटशी चव लागत नसल्याचीही तक्रार अनेक लोक करतात. कोविडमध्ये आणि त्यातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये अचानकपणे सेन्सरीन्यूरल प्रकारातील बहिरेपणही आढळून येते. विशेषत: दीर्घकाळ अतिदक्षता विभागात राहिलेल्या रुग्णांना पोझिशनल व्हर्टायगो जडल्याचे म्हणजे डोके विशिष्ट स्थितीत राहिल्याने चक्करल्यासारखे होत असल्याचे आढळून आले आहे. ब्लॅक फंगसचा नाक आणि सायनसशी संबंध येत असल्याने तिथून ही काळी बुरशी मेंदू व डोळ्यांपर्यंत पोहोचू शकते. प्रत्येक रुग्णाची स्थिती विचारात घेऊन उपचार दिले जातात व रुग्णांनी स्वत:हून औषधे घेणे योग्य ठरणार नाही. लाँग कोविड कान-नाक-घसा याच्या समस्या समजून घेतल्याने व विशेषज्ज्ञांना त्याबद्दल माहिती दिल्याने बरीचशी चिंता दूर होऊ शकेल आणि वेळच्या वेळी उपचार सुरू करता येतील.