मध्य रेल्वेसाठी सरते वर्ष ठरले कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:45 AM2019-12-30T01:45:57+5:302019-12-30T01:46:05+5:30
मुंबई-पुणे मार्ग बंद; प्रवासी संघटनेचे आंदोलन
मुंबई : रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई ते पुणे मार्गावर तीन महिन्यांचा ब्लॉक घेण्यात आला होता. २७ जुलैच्या पुरामध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली, कुर्ला-सायन या रेल्वे मार्गावर पाणी भरल्याने प्रवाशांना स्थानकाच रात्र काढावी लागली. नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद, प्रवासी संघटनेचे आंदोलन अशा घटनामुळे मध्य रेल्वेसाठी २०१९ वर्ष कर्दनकाळ ठरले आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते पुणे तिसरी मार्गिका सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांपासून बंद होती. या दरम्यान काही वेळा हा मार्ग खुला केला होता. मात्र पावसामुळे या मार्गाचे प्रचंड नुकसान झाले होते. या मार्गावरील अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना एसटीने मुंबई-पुणे प्रवास करावा लागत होता. मात्र तीन महिन्यांच्या ब्लॉकमध्ये मध्य रेल्वे प्रशासनाने हा मार्ग खुला केला. आॅगस्ट २०१९ मध्ये मुसळधार पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन स्थानकादरम्यान गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे तब्बल १२ तासांपेक्षा जास्त वेळ मध्य रेल्वेची लोकल सेवा बंद होती. पाऊस थांबणे बंद झाल्याने आणि रेल्वे रुळावरील पाणी ओसरल्याने लोकल पुन्हा सुरू झाली.
नेरळ, माथेरान या भागात जुलै, आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडल्याने रेल्वे मार्गाचे नुकसान झाले आहे. आता माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू आहे. पुढील वर्षात नेरळ ते माथेरान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे २०१९ मध्ये लोकलचे वेळापत्रक तयार करण्यात आले. मात्र यावर्षीच्या वेळापत्रकात प्रवाशांना अपेक्षित असलेल्या जादा फेऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही. वेळापत्रकात थोडेफार बदल करून नवीन वेळापत्रक तयार केले. त्यामुळे कल्याण दिशेपुढी प्रवाशांचे हाल कायम राहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची हेरिटेज इमारत गळती होत असल्याचा प्रकार सुरू झाला. इतिहासात पहिल्यांदाच सीएसएमटीची हेरिटेज इमारत गळती झाली असल्याची माहिती हेरिटेज तज्ञांनी दिली. आता यावर उपाययोजना सुरू आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल दररोज उशिरा येतात. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला इच्छितस्थळी पोहचण्यासाठी उशीर होतो. यासंदर्भात मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटनांनी आझाद मैदानात आंदोलन केले होते.