देशभरात दरवर्षी ३० लाख रुग्ण; टाटा रुग्णालयाचा अभ्यास अहवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशनमुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर होते, असा अभ्यास अहवाल नुकताच परळच्या टाटा मेमोरिअल रुग्णालयाने सादर केला. या लवकर निदानामुळे स्तनाच्या कर्करोगाने उद्भवणारे मृत्यू ३० टक्क्यांनी कमी करता येतील, असे निरीक्षणही अहवालात नमूद आहे. मागील काही वर्षांत स्तन कर्करोग रुग्णांचे मृत्यू ही गंभीर समस्या होत असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.
टाटा रुग्णालयाचा हा अभ्यास अहवाल यूकेच्या बीएमजे वैद्यकीय जर्नलमध्ये मांडण्यात आला. या अभ्यासाची सुरुवात १९९८ पासून झाली असून, यात दीड लाख महिलांचा अभ्यास करण्यात आला. वीस वर्षांच्या दीर्घ काळाच्या या अहवालातील निरीक्षणानुसार, प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांनी साधारणतः १५-२० मिनिटे स्तनाचे परीक्षण केल्यास यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे किंवा समस्यांचे लवकर निदान होते. याविषयी, माहिती देताना टाटा मेमोरिअलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले, यामुळे ५० व त्याहून अधिक वय असणाऱ्या महिलांचे ३० टक्क्यांच्या तुलनेत मृत्युदर कमी करता येऊ शकते. स्तन वैद्यकीय परीक्षणामुळे दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाने होणाऱ्या १५ हजार मृत्यूंमध्ये घट होईल, असे निरीक्षणही त्यांनी मांडले.
भारतीय महिलांमध्ये सामान्यतः स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते. देशभरात या आजारामुळे महिला रुग्णांचे होणारे मृत्यू हे सर्वाधिक आहेत. हे मृत्यू उशिराने निदान झाल्याने होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. मुंबईत ११९२ ते २०१६ दरम्यान स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात नमूद आहे. टाटा रुग्णालयाच्या वतीने १९ राज्यांतील विविध आरोग्य कर्मचाऱ्यांना स्तनांच्या कर्करोगाचे परीक्षण करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.
* या आहेत तीन पद्धती
स्तनाच्या कर्करोगाचे परीक्षण करण्यासाठी स्वतः स्तनांची तपासणी करणे, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्तनांचे परीक्षण आणि मॅमोग्राफीद्वारे स्तनांची तपासणी करणे या तीन पद्धती आहेत. याविषयी टाटा मेमोरिअलच्या ऑन्कोलाॅजिस्ट डॉ. गौरवी मिश्रा यांनी सांगितले, स्वतः स्तनांचे परीक्षण करणे हे प्राथमिक निदानाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. टाटा रुग्णालयातील तज्ज्ञांची टीम २० झोपडपट्ट्यांमधील दहावी पास विद्यार्थिनींची स्तन परीक्षण मोहीम हाती घेणार आहे.
* ग्रामीण भागांत मॅमोग्राफी उपलब्ध नाही
पाश्चिमात्य देशांत किंवा शहरी भागांत मॅमोग्राफीद्वारे स्तनांच्या कर्करोगाचे परीक्षण करण्याची पद्धत रुजू आहे. मात्र राज्यात जिल्हा व तालुका पातळीवर या वैद्यकीय चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतो, असे निरीक्षण टाटा रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. शिवाय, या वैद्यकीय चाचणीची किंमतही महाग असल्याने सर्वसामान्यांना ही चाचणी परवडणारी नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
..................