नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधणारे अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर देशभर सुरू करणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:16+5:302021-06-18T04:06:16+5:30
मुंबई : नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधून लवकर त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे देशभर अर्ली ...
मुंबई : नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधून लवकर त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे देशभर अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी दिली.
वांद्रे येथील अलियावर जंग इन्स्टिट्यूट येथील दिव्यांग बाळांसाठीच्या अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटरचे आज केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास रामदास आठवले अलियार जंग येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. देशात सध्या एकूण २ करोड ६७ लाख दिव्यांग आहेत. अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू झल्यानंतर नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधून त्यावर त्वरित उपचार केले जातील. त्यामुळे भविष्यात दिव्यांग मुलांना होणारी पीडा टाळता येईल. त्यासाठी सर्व पालकांनी आपल्या नवजात बाळांची अर्ली ईंटर्व्हेन्शन सेंटरमध्ये तपासणी करून घ्यावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले. लवकर उपचार मिळाल्यास दिव्यांगता दूर करून बाळ सदृढ, सक्षम होऊ शकते. त्यातून दिव्यांगांची वाढती संख्या कमी होत जाईल. त्यासाठी अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर महत्त्वपूर्ण असल्याचे आठवले म्हणाले.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने आज देशभरातील १४ केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. क्रॉस डिसेबिलिटी अर्ली इंटर्व्हेन्शन केंद्रांमुळे सहा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या क्षमतांमध्ये उशिराने विकास होत असल्याची समस्या आढळल्यास अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देता येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईसह दिल्ली, देहरादून, सिकंदराबाद, कोलकाता, कटक आणि चेन्नई या सात राष्ट्रीय संस्थामध्ये आणि सुंदरनगर, लखनऊ, भोपाळ, राजनंदगाव, पाटणा, नेल्लोर आणि कोझिकोड या सात प्रादेशिक केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.