हे काय, खेळण्याच्या वयात पाळणा? महिन्याला दोन अल्पवयीन गरोदर; कमी वयात नातेसंबंध ठरत आहेत कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 08:53 AM2023-04-14T08:53:14+5:302023-04-14T08:53:48+5:30

सध्याचा काळ प्रगत असून साक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

early pregnancy two minor pregnancies per month Relationships at a young age are the reason | हे काय, खेळण्याच्या वयात पाळणा? महिन्याला दोन अल्पवयीन गरोदर; कमी वयात नातेसंबंध ठरत आहेत कारणीभूत

हे काय, खेळण्याच्या वयात पाळणा? महिन्याला दोन अल्पवयीन गरोदर; कमी वयात नातेसंबंध ठरत आहेत कारणीभूत

googlenewsNext

मुंबई :

सध्याचा काळ प्रगत असून साक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या अशा परिस्थितीतसुद्धा आपल्याकडे बालविवाहाच्या घटना किंवा कमी वयात झालेल्या नातेसंबंधामुळे अल्पवयीन मुलींमध्ये गर्भधारणा होण्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे खेळण्या- बागडण्याच्या वयात मुली गरोदर राहत असून त्यांची प्रसूती सरकारी रुग्णालयात पार पडत असल्याने वैद्यकीयतज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. 
  सर्वसाधारणपणे महिन्याला दोन घटना घडत असल्याचे डॉक्टर सांगतात. सध्या आधुनिक जीवन जगण्याकडे वाढलेला कल, मोबाइलवर इंटरनेटमुळे दिसणाऱ्या गोष्टी याची भुरळ तरुणाईला पडते. आणि त्याचे अनुकरण करून या अशा गोष्टी समाजात घडत असल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे. आपल्या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

कायदेशीर कारवाई
सध्याच्या या सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे प्रेमात पडण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यानंतर कमी वयात नातेसंबंध निर्माण होऊन मुली गरोदर राहण्याचे प्रकार घडताना पाहायला आढळून येतात. १६ वर्षांखाली मुलगी गरोदर राहिली असेल तर  पाेक्साे कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाते.

पोलिसांना दिली जाते माहिती
मुंबईत सरकारच्या जे.जे. आणि कामा रुग्णालयात महिन्याला सर्वसाधारण दोन अल्पवयीन मुलींची प्रसूती होते. मात्र, या घटनेची संपूर्ण माहिती ही स्थानिक पोलिस ठाण्याला दिल्यानंतर त्यावरील कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर, डॉक्टरांना सूचना मिळाल्यानंतर या प्रसूती होतात. काही वेळा यामध्ये गर्भपातासाठीसुद्धा मुली येतात. यामध्ये त्या मुलीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अल्पवयीन मुली गरोदर राहण्याची काही कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारण जे आम्हाला दिसते ते म्हणजे  बालविवाह, बलात्कार, कमी वयात निर्माण झालेले नातेसंबंध ही आहेत. काेणतीही अल्पवयीन मुलगी गर्भपात किंवा प्रसूतीसाठी आल्यास त्यांची पहिली नोंद पोलिसांकडे केली जाते. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रसूती किंवा गर्भपात केला जातो. या अशा पद्धतीची फार कमी प्रकरणे आमच्या रुग्णालयात येतात. आम्ही सगळी प्रकरणे ही पोलिसांकडे नेतो. त्यानंतर पोलिस सर्व नियमानुसार प्रक्रिया पार पाडतात.   
- डॉ. तुषार पालवे, अधीक्षक, कामा  रुग्णालय

नागरिकांमध्ये अजूनही बालविवाहच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. ज्यावेळी अशा घटनांची माहिती कळते त्यावेळी ते बालविवाह रोखलेही जातात. तसेच शाळेतील शिक्षकांनी या विषयी मुलांमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे. सर्व शाळांमध्ये  बालसभा घेऊन संवाद साधला गेला पाहिजे. ‘गुड टच आणि बॅड टच’ यावर बोलले पाहिजे.  बेकायदा गर्भपाताच्याही घटना घडतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात या घटना अधिक दिसतात. यासाठी  गावपातळीवर मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाल विवाहाच्या घटना घडतात. तसेच आपल्याकडे एखाद्या मुलीने पुढे येऊन बालविवाहाची  तक्रार केली तर त्या मुलीची पुढची काळजी सरकार घेईल, असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. तरच हे प्रकार थांबतील.    
- सुशीबेन शहा, अध्यक्ष, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

Web Title: early pregnancy two minor pregnancies per month Relationships at a young age are the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.