...तर प्राप्तिकर खातं तुम्हाला देणार 5 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 08:35 PM2018-04-27T20:35:20+5:302018-04-27T20:35:20+5:30
प्राप्तिकर खातं बक्षीस देणार
मुंबई: प्राप्तिकर विभागाला काळ्या पैशांची सूचना देणाऱ्यांना पाच कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणाराय. प्राप्तिकर विभागानं 'इन्कम टॅक्स इन्फॉर्मेंट्स रिवॉर्ड स्कीम 2018'ची घोषणा केली आहे. यानुसार परदेशातील अघोषित संपत्तीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पाच कोटींपेक्षा अधिक रकमेचं बक्षीस देण्यात येईल. कर चोरी आणि बेनामी संपत्तीची माहिती प्राप्तिकर विभागाला दिल्यावरही बक्षीस दिलं जाईल.
एखाद्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीमुळे कर चोरी पकडली गेल्यास, त्या व्यक्तीला बक्षीस दिलं जाईल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बक्षिसाची रक्कम पकडण्यात आलेल्या रकमेच्या 10 टक्के इतकी असेल. कर चोरी उघडकीस आणणाऱ्या व्यक्तीस जास्तीत जास्त पाच कोटींची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. याआधीच्या म्हणजेच 28 ऑगस्ट 2015 रोजी देण्यात आलेल्या आदेशांनुसार कर चोरीची सूचना देणाऱ्या व्यक्तीला लगेच एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जातं. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास झाल्यावर एकूण करचोरीच्या रकमेपैकी 10 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.
खबऱ्यांचं मजबूत जाळं असल्यास बेनामी संपत्ती मोठ्या प्रमाणात येऊ शकतील, असं प्राप्तिकर विभागातील अनेक अधिकाऱ्यांना वाटतं. 'बक्षिसाची रक्कम कमी असल्यास आणि ती रक्कम शोधून काढण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्यास कोणताही खबरी माहिती देण्यासाठी पुढे येणार नाही,' असं अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं. 1 नोव्हेंबर 2016 पासून बेनामी संपत्ती कायदा लागू झाला. तेव्हापासून 11 जानेवारी 2018 पर्यंत प्राप्तिकर खात्यानं 900 मालमत्तांवर टाच आणलीय. यामध्ये जमीन, फ्लॅट, दुकानं, दागिने, गाड्या, बँक खात्यातील रोकड, मुदत ठेव यांचा समावेश आहे. या संपत्तीचं एकूण मूल्य साडे तीन हजार कोटी आहे.