लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेने मदतीची तयारी दाखवली, तरी आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा मार्ग स्वत:चा स्वत:च शोधा, असा इशाराही दिला. त्यात बेस्ट बचतीसाठी प्रस्तावित केलेला कृती आराखडा अंमलात येण्याआधीच वादात सापडला. यामुळे बेस्ट उपक्रमाने कमाईचा जुनाच मार्ग बेस्ट ठरवत, मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रचारमोहीम सुरू केली आहे. प्रचाराअभावी दुर्लक्षित राहिलेल्या योजनांचा यात समावेश आहे. या योजना प्रवासी, वीजग्राहक आणि बेस्टच्या तिजोरीसाठीही बेस्टच ठरतील, असा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. कर्जबाजारी बेस्ट उपक्रमाला टाळे लागण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन देण्यासाठीही बेस्टकडे पैसे नाहीत. त्यामुळे ही आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्टने पालक संस्था असलेल्या महापालिकेकडे मदतीसाठी हात पसरले होते. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मदत देण्याची तयारी दाखवली. मात्र, यापूर्वीही बेस्टने पालिकेकडून १६०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ही रक्कम कामगारांचे वेतन व देणी चुकवण्यातच खर्ची झाली. त्यामुळे आधी आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा कृती आराखडा तयार करण्याची अट आयुक्तांनी घातली. त्याप्रमाणे, बेस्ट प्रशासनाने आराखडा तयार करीत या दिशेने पहिले पाऊल म्हणून तुटीत असलेल्या वातानुकूलित बसगाड्या बंद केल्या आहेत.या आराखड्यावर अंमल करून ७०० ते ८०० कोटी रुपये वाचवणे बेस्टला शक्य होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, स्वेच्छानिवृत्तीच्या शिफारशीने हा आराखडा अडचणीत आला आहे. त्यामुळे बेस्टने कंबर कसत, प्रवासी आणि उत्पन्न वाढवण्याचे बेस्ट मार्ग आणले आहेत. यामध्ये बेस्ट ई-पर्स, ओळखपत्राशिवाय दैनंदिन बसपास, लग्न समारंभांमध्ये बेस्ट बसगाड्या भाड्याने देण्याच्या प्रस्तावांचा समावेश आहे. या योजना जुन्या असल्या, तरी प्रसिद्धीअभावी प्रवाशांपर्यंत पोहोचल्या नसल्याने, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.
कमाईचे ‘बेस्ट’ मार्ग
By admin | Published: May 11, 2017 1:42 AM