लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑनलाइन शिक्षण सेवा देणाऱ्या पिजन एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीने भारतात कमावलेला पैसा अवैधरीत्या चीनमध्ये पाठवत परदेशी विनिमय चलन कायद्याचा (फेमा) भंग केल्याचा ठपका ठेवत ईडीने संस्थेची ३ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कंपनी ओडा क्लास नावाने ऑनलाइन पद्धतीने विविध शैक्षणिक कोर्स चालवते. मात्र, कंपनीच्या चिनी संचालकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कंपनीची जाहिरात करण्याचे कारण देत भारतीय बँक खात्यातून ८२ कोटी ७२ लाख रुपये चीन व हाँगकाँग येथे वळवले. ईडीच्या चौकशीदरम्यान कंपनीला या ८२ कोटी रुपयांच्या व्यवहाराचे कोणतेही स्पष्टीकरण देता आले नाही. तसेच, जाहिरात करण्यासाठी ते पैसे परदेशात वळवल्याचा दावा केला असला तरी त्याची कोणतीही कागदपत्रे कंपनीला ईडीपुढे सादर करता आली नाहीत. या प्रकरणाचा तपास ईडीचे अधिकारी एप्रिलपासून करत असून यापूर्वी कंपनीची ८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. शुक्रवारच्या कारवाईनंतर एकूण १२ कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे.