मुंबई - वर्षभराची असलेल्या कुशी सोनीने अनवधानाने इअररिंग गिळली. परळ येथील बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने बुधवारी संध्याकाळी ब्रॉन्कोस्कोपी करून, अवघ्या ३० मिनिटांत ती रिंग बाहेर काढली.कुशीने अनवधानाने इअररिंग गिळली. परिणामी, तिला ताप आला आणि खोकला येऊ लागला. तिची आई तिला बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन गेली आणि तिला औषधे लिहून देण्यात आली, पण त्याने काहीच दिलासा मिळाला नाही. त्यानंतर, कुशीला तीन दिवस सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी एक्स-रे काढला, पण काहीच निदान झाले नाही. कारण ही वस्तू गळ्याच्या वरच्या भागात अडकली होती. मुलीची प्रकृती खालावत चालली होती. डॉक्टरांनी तिला इन्ट्युबेट केले आणि तिला अधिक सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली. कुशी पुढील तीन दिवस खासगी रुग्णालयात होती. त्यानंतर, तिला वाडिया बालरुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. दिव्य प्रभात यांनी रुग्णाला तपासले असता, मुलांकडून काही समजत नसल्याने अशा प्रकारे एखादी वस्तू गिळली गेली असेल, तर त्याकडे दुर्लक्ष होते. डॉक्टरांच्या चमूने मुलगी दाखल झाल्यानंतर, तिचा एक्स-रे काढला. तिच्या शरीरात वस्तू असल्याचे निश्चित झाले आणि तिला आॅपरेशन थिएटरमध्ये नेले. ३० मिनिटांत तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ही शस्त्रक्रिया झाल्याने गुरूवारी तिचा वाढदिवस डॉक्टरांनी रूग्णालयात साजरा केला. \शनिवारी घरी पाठवणारया जीव वाचविणाऱ्या उपचारांसाठी शस्त्रक्रिया किंवा ट्रॅकेओस्टोमी करण्याची आवश्यकता भासली नाही. मुलीला एक्स्ट्युबेट करण्यात आले आहे आणि ती सामान्यपणे आहार घेत आहे, असे डॉ. प्रभात म्हणाल्या.वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, अशा रुग्णांची स्थिती अत्यंत गुंतागुंतीची असते आणि त्यांच्यावर काही वेळा तातडीने उपचार करणे आवश्यक असते. कुशीच्या प्रकृती स्थिर असून, तिला कोणताही धोका नसून शनिवारी तिला घरी पाठवण्यात येणार आहे.
बाळाच्या श्वसननलिकेतून काढले इअररिंग, वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:27 AM