नारायण राणेंचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना नितेश राणेंकडूनही तितक्याच बेछूटपणे प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे. संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात कुठलाही रस नसून संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्याबाबत धक्कादायक दावा करताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला असं कळवलंय की, आता काय उद्धव ठाकरेंचं खरं नाही. त्यांचा पक्ष राहिलेला नाही. आता ते मला खासदार बनवू शकत नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात अर्थ राहिलेला नाही. म्हणून माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्या.
ज्या दिवशी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला तेव्हा संजय राऊत यांना त्यांच्यासोबत बसायचं होतं. त्यामुळे त्यादिवशी सकाळपासून संजय राऊत शरद पवार यांच्याशी संपर्क साधत होता. पण शरद पवार हे फोन उचलत नव्हते. त्यानंतर संजय राऊत संध्याकाळी तडकाफडकी सिल्व्हर ओकवर गेले. आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय की संजय राऊत हे साप आहेत. तुम्ही सापाला दूध पाजत बसलेले होता. संजय राऊत हे बाळासाहेबांचे झाले नाहीत. ते तुमचेही होणार नाहीत. राऊत यांनी बाळासाहेबांच्या काळात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात भांडणं लावली. त्यानंतर आता तेच उद्धव ठाकरेंच्या कुटुंबात करताहेत. संजय राऊत हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, तेव्हा त्यांचे खरे मनसुबे उद्धव ठाकरेंना कळतील. तसेच एका माणसामुळे आपण किती लोकांना तोडलं याची जाणीव उद्धव ठाकरेंना होईल.