नॉनकोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचा मार्ग सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 04:07 AM2020-08-27T04:07:20+5:302020-08-27T04:07:28+5:30
शहर उपनगरात १०८च्या ९३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत, यात कोरोनासाठी ६४ रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आल्या होत्या.
मुंबई : मागील पाच महिन्यांच्या दीर्घ प्रयत्नांनंतर आता मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. सुरुवातीच्या काळात मात्र रुग्णांना खाटेपासून ते अगदी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासही त्रास सहन करावा लागला. आता कोविडची स्थिती आटोक्यात आल्यानंतर नॉनकोविड रुग्णांनाही रुग्णवाहिका उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहर उपनगरात १०८च्या ९३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत, यात कोरोनासाठी ६४ रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आल्या होत्या. या १०८च्या रुग्णवाहिकांनी मार्च महिन्यापासून १५ आॅगस्टपर्यंत मुंबईतील ३४ हजार ९९० रुग्णांना सेवा दिली आहे. त्यातील २५ हजार ८८५ कोरोना रुग्ण होते, तर ९ हजार १०५ नॉनकोविड रुग्ण होते. शहर-उपनगरात आता बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८१ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर एक लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
तर १०८ रुग्णालय बीव्हीजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले, कोरोनाचे संकट आल्यापासून राज्यात १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी अखंड रुग्णसेवा केली आहे. केवळ कोरोना रुग्ण नव्हे तर अन्य आजाराच्या रुग्णांनाही आपला जीव धोक्यात घालून उपचार मिळेपर्यंत प्रयत्न केले आहेत.
अन्य आजारांच्या रुग्णांनी मानसिक भीती घेतल्यामुळे रुग्णालयात उपचारास येण्यासही धास्तावत आहेत. मात्र आता रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू झाले असून रुग्ण रुग्णालयात पोहोचण्यासाठी, कोविडची भीती कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या पातळीवर नियमावली आखली जाणार आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिक ा