मुंबईत होणार ईस्ट इंडियन हब

By admin | Published: June 26, 2015 01:55 AM2015-06-26T01:55:39+5:302015-06-26T01:55:39+5:30

मुंबईतील ईस्ट इंडियन समुदायाने एकत्र येऊन लवकरच आंतरराष्ट्रीय ईस्ट इंडियन हब स्थापन करण्याचे ठरविले आहे. यासाठी वेगवेगळ्या ईस्ट इंडिया

East Indian Hub to be held in Mumbai | मुंबईत होणार ईस्ट इंडियन हब

मुंबईत होणार ईस्ट इंडियन हब

Next

स्नेहा मोरे, मुंबई
मुंबईतील ईस्ट इंडियन समुदायाने एकत्र येऊन लवकरच आंतरराष्ट्रीय ईस्ट इंडियन हब स्थापन करण्याचे ठरविले आहे. यासाठी वेगवेगळ्या ईस्ट इंडिया असोसिएशन्सने एकत्र येत हबचा मास्टर प्लान तयार केला आहे. आता भूखंडासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
मागील काही वर्षांपासून केंद्र शासन, राज्य शासन असो वा पालिका पातळीवरही ईस्ट इंडियन हब बांधण्याच्या मागणीसाठी प्रयत्न करूनही समुदायाच्या पदरी निराशा आली. त्यामुळे जानेवारी, २०१५ पासून नव्या उमेदीने मुंबईतील ईस्ट इंडियन्स एकवटले. त्यानंतर ईस्ट इंडियन हब उभारण्यासाठी समिती तयार करून विविध पातळीवर प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर या समितीने ईस्ट इंडियन हबचा अंतिम आराखडा तयार केला आहे. मुंबईतीलच सुमारे १५ हजार चौरस फूट भूखंडाच्या प्रतीक्षेत आहे. मुंबईतील एकूण २० ईस्ट इंडियन असोसिएशन्स या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत.
मुंबईतील या आंतरराष्ट्रीय ईस्ट इंडियन हबमध्ये ईस्ट इंडियन आॅडिटोरिअम, संग्रहालय, कॉन्फरन्स रूम, कार्यालय आणि या समुदायाची खाद्यपरंपरा कायम ठेवणारे विशेष रेस्टॉरंट असणार आहे. शिवाय, या हबमध्ये ४ हजार चौ. फुटांचे दोन मुख्य सभागृह असतील. आॅडिटोरिअमची क्षमता ५०० व्यक्तींची असेल. तर आॅडिटोरिअममध्ये समुदायातील सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. कॉन्फरन्स रूममध्ये १५-२० व्यक्तींची क्षमता असेल, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा समावेश या आंतरराष्ट्रीय ईस्ट इंडियन हबच्या अंतिम आराखड्यात करण्यात आला आहे. याशिवाय वूडहाऊस, बोटहाऊस यांचाही यात समावेश करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय ईस्ट इंडियन हबच्या उभारणीसाठी स्वत: समुदायातील सर्वच जण निधीची जमवाजमव करत आहेत. समाजातील इच्छुकांनीही याला हातभार लावण्याचे आवाहन मोबाई गावठाण पंचायतीचे सदस्य अ‍ॅल्फी डिसूझा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
विविध संस्कृतीचा लोप होत असताना आपल्या संस्कृतीचे वेगळेपण आणि महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे, याची पूर्ण काळजी हब उभारण्याच्या प्रक्रियेत घेण्यात येणार असल्याचे या हबचे वास्तुविशारद आॅड्री डिसूझा यांनी सांगितले. शिवाय, हा प्रकल्प डिसेंबर, २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार डिसूझा यांनी व्यक्त केला.

Web Title: East Indian Hub to be held in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.