किनारपट्टीसह पूर्व विदर्भात कोसळधार?
By admin | Published: August 3, 2015 01:59 AM2015-08-03T01:59:28+5:302015-08-03T01:59:28+5:30
पश्चिम बंगालवरील ‘कोमेन’ चक्रीवादळाचा जोर ओसरला असला तरी प्रभाव कायम असून, त्यामुळे देशाच्या पूर्व भागात जोर पकडलेल्या पावसाचा वेग कायम आहे
मुंबई : पश्चिम बंगालवरील ‘कोमेन’ चक्रीवादळाचा जोर ओसरला असला तरी प्रभाव कायम असून, त्यामुळे देशाच्या पूर्व भागात जोर पकडलेल्या पावसाचा वेग कायम आहे. या हवामान बदलांमुळे मध्य भारतावर सुरू झालेला पाऊस पुढील ४८ तासांत महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर मुसळधार कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
‘कोमेन’ चक्रीवादळामुळे पूर्व आणि ईशान्य भारतावरील पावसाळी वातावरणात बदल झाले असून, मान्सून अधिक सक्रिय झाला आहे. परिणामी, राजस्थान, गुजरातसह मध्य भारतावर मुसळधार सरी कोसळत आहेत. पूर्वेकडील वाऱ्याच्या वेगामुळे पावसाचे हे वातावरण पश्चिम भारतावर सरकत असून, पुढील ४८ तासांत राज्याच्या किनारी भागात जोरदार वृष्टी होईल. तर मध्य भारतावरील पावसाळी वातावरणामुळे पूर्व विदर्भातही पावसाचा चांगला शिडकावा होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. बांगलादेशाच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरला आहे. आणि हे कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि लगतच्या गंगोत्रीवर आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरातील पावसाचा जोर ओसरला असला तरी अधून-मधून पडणाऱ्या सरींचा वेग कायम आहे. रविवारी उन्हाचे प्रमाण दिवसभर अधिक असल्याचे चित्र होते. पुढील २४ तासांत मुंबईत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २७ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)