१२ वर्षांनंतर ईस्टर्न फ्रीवेची होणार डागडुजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:42 PM2023-11-27T12:42:10+5:302023-11-27T12:42:52+5:30
पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईतील अंतर कमी करण्यात महत्त्वाचा पर्याय ठरलेल्या ईस्टर्न फ्रीवेची डागडुजी करण्यास मुंबई पालिकेने सुरुवात केली आहे.
मुंबई : पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईतील अंतर कमी करण्यात महत्त्वाचा पर्याय ठरलेल्या ईस्टर्न फ्रीवेची डागडुजी करण्यास मुंबई पालिकेने सुरुवात केली आहे. या कामासाठी ३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा मार्ग हस्तांतरित झाल्यापासून पालिकेने पहिल्यांदाच रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.
२०१० साली एमएमआरडीएने १६ किमीचा हा मार्ग बांधला. २०१५ साली मार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी आता पालिकेकडे आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गाच्या दुरुस्तीचा काही प्रश्न उद्भवला नव्हता. मात्र, आता काही पट्ट्यात रस्त्यांची अवस्था खराब झाल्यामुळे रस्त्यांची डागडुजी करण्याची गरज निर्माण झाली आहे. दक्षिण मुंबईच्या दिशेकडील रस्ते अजूनही सुस्थितीत आहेत. उपनगर भागाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील काँक्रीट उखडले आहे. मार्ग उन्नत असून काही भागात वळणेही आहेत. त्यामुळे रस्ता समतोल असणे आवश्यक असते.
अपघाताची दाट शक्यता:
रस्त्यावर खड्डे पडणे किंवा रस्त्याचा समतोल बिघडणे यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची भीती असते.
पालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. पूर्व उपनगराच्या दिशेकडील बोगद्यात वरून पाणी टपकण्याचे प्रकार सुरू असतात.
अनेकदा बोगद्यात पाणी साचलेले असते. ही पाणी गळती शोधून उपाययोजना करण्याचे कामही करावे लागणार आहे.
विस्तारात अडचणी :
चेंबूर ते दक्षिण मुंबईतील पिडिमेलो मार्ग हा प्रवास अवघ्या २० मिनिटात पूर्ण होतो. मात्र, सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी पिडिमेलो मार्गाच्या टोकाला वाहतूककोंडी होते.
या वाहतूककोंडीमुळे संध्याकाळी याच परिसरातून पिडिमेलो मार्गावरील फ्रीवेपर्यंत येईपर्यंत जास्त वेळ खर्ची पडतो. त्यामुळे चेंबूर ते दक्षिण मुंबई प्रवासातील वेळेची बचत वाया जाते. मात्र, विस्तारच्या योजनेतही अडचणी निर्माण झाल्या आहेत.