Join us

ईस्टर्न लीड....ट्रॉम्बेमध्ये तिवरांची सर्रास कत्तल

By admin | Published: September 02, 2014 7:36 PM

ईस्टर्न लीड....

ईस्टर्न लीड....
फोटो मेलवर आहेत...

ट्रॉम्बेमध्ये तिवरांची सर्रास कत्तल, तिवर तोडून अनधिकृत झोपड्यांची उभारणी
प्रशासनाची कुंभकर्णी झोप

ट्रॉम्बे: शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी झाडे लावण्याचा संदेश शासनाकडून दिला जातो. दुसरीकडे मात्र मानखुर्द आाणि ट्रॉम्बे परिसरात पोलीस अणि पालिका अधिकार्‍यांच्या आशीवार्दाने तिवरांचे जंगल संपवण्याचे सत्र सुरु आहे. तिवरांची दिवसाढवळ्या सर्रास कत्तल करुन त्याजागी हजारो अनधिकृत झोपड्या उभारल्या जात असताना सरकारी यंत्रणा मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. प्रशासन कानाडोळा करत असल्याने स्थानिक रहिवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. थेट तिवरांची कत्तल करुन सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचेही खुलेआमपणे उल्लंघन होत असल्याने आता सरकारच्या कारवाईची प्रतीक्षा येथील नागरिकांना आहे.
वर्षभरापासून ट्रॉम्बेतील सेक्टर डी, सेक्टर ई आणि आंबडेकर नगर या परिसरात भूमाफियांकडून राजरोसपणे तिवरांची कत्तल होत आहे. कत्तलीनंतर या झाडांवरच मोठ्या प्रमाणात भरणी टाकून ती जागा अडवण्यात येते. काही दिवसांतच पत्र्याच्या झोपड्या आणि कालांतराने त्याच जागी पक्की घरे राजरोसपणे उभारली जात आहेत. गेल्या वर्षभरात अशाप्रकारे या ठिकाणी हजारो अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. या परिसरात सध्या भूमाफियांकडून झोपड्यांचे दर चार ते पाच लाख रुपये आकारण्यात येत आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांचा तसेच पालिकेच्या एम पूर्व विभागातील एक वरिष्ठ अधिकारी देखील भूमाफियांना पाठिंबा देत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या सर्वांना त्यांचा हिस्सा मिळत असल्याने तक्रारी दाखल होऊनही सरकारी यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कधी-कधी तर तक्रार करणार्‍यावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे अनेकजण कोंडवाड्यात पडण्यापेक्षा गप्प राहणेच पसंत करत आहेत. त्यामुळे आता सरकारी यंत्रणा कामाला लागून भूमाफियांना आळा घालणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दक्षिण मध्य मुंबईतील सर्वाधिक प्रदूषित परिसर म्हणून चेंबूर, मानखुर्द आणि ट्रॉम्बेची ओळख आहे. याठिकाणी आरसीएफ, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएआरसी, टाटा वीज प्रकल्प आणि ॲजीस अशा अनेक मोठमोठ्या रासायनिक कंपन्या आहेत. तसेच देवनार कत्तलखाना, देवनार डंपिंग ग्राऊंड हे पालिकेचे काही प्रकल्पही आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. परिणामी याठिकाणी राहणार्‍या अनेक रहिवाशांना दमा, श्वसनाचा त्रास होत असतो. यापासून काही प्रमाणात तरी दिलासा मिळावा, यासाठी पालिकेकडून रहिवाशांना झाडे लावण्याची विनंती केली जातेे. मात्र, काही भ्रष्ट अधिकार्‍यांच्या आशीवार्दामुळे या परिसरातील निसर्गाची देणगी असलेल्या तिवरांचीच मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे एखादी मोठी आपत्ती आल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त होत आहेत. (प्रतिनिधी)