मुंबई : मुंबईत सर्व ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दुकाने सुरू ठेवण्यास पालिकेने परवानगी दिल्यानंतर व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सलग तीन दिवस मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्यास संमिश्र प्रतिसाद दर्शविला.शुक्रवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर सकाळपासूनच व्यापाºयांनी आपली दुकाने उघडली. ग्राहकांनी दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. तीन दिवस पाऊस पडत असल्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडू शकले नव्हते़ शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नागरिकांनी दुकानांवर खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिल्यानंतर पालिकेने सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र बुधवारपासून दुकाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून उघडण्यास परवानगी दिल्यामुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला होता. परंतु पावसामुळे पूर्व उपनगरातील अनेक दुकानदारांनी मुख्य बाजारपेठांमधील दुकाने उघडली नाहीत. शुक्रवारी कुर्ला पूर्व आणि पश्चिम, चेंबूर स्थानक परिसर, चेंबूर कॅम्प, घाटकोपर व मुलुंड येथे सर्व व्यापाºयांनी दुकाने सुरू केली होती.
कुर्ला पूर्व येथील किराणा दुकानाचे व्यापारी किशोर यादव यांनी सांगितले की, पालिकेने सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी दिल्यामुळे आनंद झाला. दुकानांवर आता ग्राहकांची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी निघून गेलेल्या दुकानातील कामगारांना परत बोलावले आहे. हळूहळू परिस्थिती, जनजीवन पूर्वपदावर येत आहे.चेंबूर कॅम्प येथील गॅरेज मालक विक्रांत माने यांनी सांगितले की, गाड्यांच्या दुरुस्तीसाठी येणाºया ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची काळजी घेतली जात आहे. चेहºयाला मास्क असेल तरच आमच्याकडून ग्राहकांना सेवा देण्यात येत आहे.