लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहर आणि उपनगरात सहजरीत्या उपलब्ध होत असलेल्या खाद्यामुळे मुंबईत दाखल होणाऱ्या माकडांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. माकडांनी मांडलेल्या उच्छादामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे उच्छाद मांडलेल्या माकडांना ताब्यात घेऊन जंगलात सोडले जाते. तरीदेखील ते पुन्हा शहरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्राणी अभ्यासकांनी सांगितले.
मुंबई शहर आणि उपनगरातील जंगलाचे प्रमाण कमी होत असले तरीही आरे कॉलनी भांडूप, मुलुंड, माहीम, राणीची बाग आणि अशा काहीशा हिरवळ असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. येथे माकडांचे वास्तव्य असून, मुंबईच्या आसपास असलेल्या जंगलात माकडांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगर मोठ्या प्रमाणावर माकडांनी उच्छाद मांडला आहे. विशेषतः मुंबईच्या उपनगरात माकडांनी उच्छाद मांडला आहे. वनविभागासोबत यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुंबई शहर आणि उपनगर गेल्या काही वर्षांपासून माकडांची संख्या वाढली आहे. या व्यतिरिक्त त्यांना सहजदृष्ट्या खाद्य उपलब्ध होत आहे. परिणामी त्यांच्या प्रजनन क्षमतेतदेखील वाढ होत आहे. अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील माकडांची संख्या वाढते आहे. या माकडांना पकडण्यासाठी अनेक तक्रारी दाखल होत असल्या तरीदेखील एक वेळ वाघाला पकडणे सोपे आहे, पण माकडाला पकडणे अवघड आहे, अशा प्रकारचा सूर उमटत आहे.
कारण माकडाला पकडणारी टीम एखाद्या परिसरात दाखल झाली, तर सावध झालेले माकड एवढ्या उंचीवर जाऊन बसते की तेथे शूट करणे कठीण होऊन बसते. शिवाय पकडलेल्या माकडाला जंगलात नेऊन सोडले तरीदेखील ते तेथे पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणजे माकडांच्या टोळीमधील जो मुख्य नर आहे त्याला पकडून जंगलात सोडले तर साहजिकच उर्वरित माकडे सहज त्यादिशेने फिरतील आणि त्यांची शहरात परतण्याची शक्यता कमी असेल. मात्र हे प्रमाण फारच कमी आहे, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.