घरगुती वीजग्राहकांना बिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 04:54 AM2020-06-24T04:54:15+5:302020-06-24T04:54:25+5:30
आता अनलॉकनंतर मीटर रीडिंग सुरू झाली असून, आता येत असलेल्या अव्वाचा सव्वा वीजबिलांनी वीजग्राहकांना शॉक बसला आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह राज्यभरात विजेचा पुरवठा करणाऱ्या वीज कंपन्यांनी लॉकडाऊन दरम्यान मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांची सरासरी वीजबिले आपापल्या ग्राहकांना पाठविली. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यातील वीजबिलाच्या वापरावर ही सरासरी काढण्यात आली. मात्र आता अनलॉकनंतर मीटर रीडिंग सुरू झाली असून, आता येत असलेल्या अव्वाचा सव्वा वीजबिलांनी वीजग्राहकांना शॉक बसला आहे.
परिणामी, वीजग्राहकांनी संबंधित वीज कंपन्यांकडे याप्रकरणी तक्रारी दाखल केल्यावर वाढीव वीजबिलाबाबत कंपन्या ग्राहकांना कसा दिलासा देणार? याकडे सर्वांचे लागले असतानाच महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे. स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येतील, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
वीज क्षेत्रातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फक्त मुंबईचा विचार करता
एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईमध्ये रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत एसीचा वापर दररोज सरासरी ६०० मेगावॅटने वाढला. सर्वसाधारण हा वापर १८०० असून, ६०० मेगावॅटच्या वाढीने हा आकडा २ हजार ४०० मेगावॅटवर गेला. राज्यातही हीच परिस्थिती होती. महावितरणच्या वसुलीचा विचार करता एप्रिलमध्ये ही वसुली २ हजार कोटी रुपयांनी कमी झाली. जी प्रत्यक्षात ५ हजार ५०० कोटी रुपये असणे अपेक्षित होती. ती २ हजार ८०० झाली.
महत्त्वाचे म्हणजे, मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांची वीजेबिले ही डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांच्या वीजबिलावर काढण्यात आली. त्या तीन महिन्यांत हिवाळा होता. साहजिकच या काळात विजेचा वापर कमी झाला. तर मार्च, एप्रिल, मे आणि तीन महिन्यांच्या काळात उन्हाळा होता. परिणामी साहजिकच या काळात विजेचा वापर वाढला.
>महावितरण काय म्हणते?
वीजग्राहकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी वीजबिलांचा भरणा केला असल्यास जूनमधील तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलामध्ये एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार व विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना हिवाळ्यातील वीजवापराप्रमाणे सरासरी देयके पाठविली होती.
>टाटा पॉवर काय म्हणते?
आता पाठविण्यात येणारी बिले ही ९१ दिवसांची आहेत. या कालावधीत आपले सर्व कुटुंब २४ तास घरातच राहिले होते. अशा परिस्थितीत तब्बल तीन महिने आपण एरवीपेक्षा किती वीज जास्त वापरली, याचा आढावा ग्राहकांना घेता यावा म्हणून सुविधा उपलब्ध आहे. टाळेबंदीच्या कालावधीत ग्राहकांनी किती वीज दररोज वापरली, याचा अंदाज मिळेल. यासाठी १९१२३ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा. ग्राहक साहाय्य केंद्राला भेट द्यावी. टाळेबंदीच्या काळातील अंदाजित बिलांनुसार, प्रत्यक्ष वीजवापर व त्यानुसार होणारी बिलाची रक्कम यांचा मेळ घालून अंतिम बिल तयार करण्यात येते.
>अदानी इलेक्ट्रिसिटी
काय म्हणते?
मीटर रीडिंग सुरू झाले आहे. त्यानुसार आता वीजबिले ग्राहकांना येत आहेत. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील फरक जूनच्या बिलात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वीजबिले ग्राहकांना व्याजासह हप्त्यानेसुद्धा भरता येणार असून, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसारच वीजबिलाची कार्यवाही झाली आहे.