गणेशभक्तांचा मध्यरात्रीचा प्रवास सुकर, अनंत चतुर्दशीला तिन्ही मार्गांवर विशेष लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:49 AM2023-09-27T11:49:38+5:302023-09-27T11:50:16+5:30
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी २८ सप्टेंबरला मध्यरात्री रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर १० विशेष लोकल धावणार आहे.
मुंबई :
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी २८ सप्टेंबरला मध्यरात्री रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर १० विशेष लोकल धावणार आहे. त्यामुळे विसर्जनानंतर रात्रीपर्यंत गणेशभक्तांना इच्छीतस्थळ गाठता येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
दादर, गिरगाव चौपाटीवर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखो नागरिक येतात. त्यांना या स्पेशल लोकलमुळे रात्री आणि पहाटेच्यावेळी प्रवास करणे शक्य होणार आहे. उत्सवकाळातील गर्दीमुळे गणरायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही, असे भाविक विसर्जनाच्या दिवशी दर्शन घेण्याचे नियोजन करतात. या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण, सीएसएमटी ते पनवेल दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा १० स्पेशल लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहे. या लोकल धिम्या मार्गावर धावणार असल्याने सर्वच रेल्वे स्थानकात थांबणार आहेत. तर, भाविकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने यंदाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत आठ स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. पहाटेपर्यंत लोकल धावणार आहेत.
असे असेल वेळापत्रक
मध्य रेल्वे
कल्याण-सीएसएमटी लोकल रा.१२.०५
ठाणे-सीएसएमटी लोकल रात्री १ वाजता आणि रात्री २ वाजता
सीएसएमटी-कल्याण लोकल रात्री १.४० वाजता आणि पहाटे ३.२५ वा
सीएसएमटी-ठाणे लोकल रा. २.३० वा
हार्बर मार्ग
सीएसएमटी-बेलापूर लोकल -रात्री १.३०वाजताआणि रात्री.२.४५वाजता
बेलापूर-सीएसएमटी लोकल- रात्री १.१५ वा. रात्री २ वाजता
पश्चिम रेल्वे
चचर्गेटहून विरारला जाणारी लोकल रात्री १.१५,रात्री१.५५,रात्री २.२५,रात्री ३.२० वाजता
विरारहून रात्री १२.१५,रात्री १२.४५, रात्री. १.४० आणि पहाटे ३ वाजता