नियोजनाअभावी अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा विचार शासन करीत असले तरी परीक्षा नेमकी कशी घ्यायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी अकरावीत प्रवेश घेण्यासाठी कोणते निकष लावले जाणार याची चिंताही आहे.
मुंबई विभागात अकरावीच्या प्रवेशासाठी ओढाताण होत नसली तरी मोठ्या शहरातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी पालक मेटाकुटीला येतात. अकरावीच्या प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची ऑफलाइन सीईटी परीक्षा घेण्याविषयी शिक्षण विभाग चाचपणी करत आहे. यातील गुणांवरच अकरावीचे प्रवेश निश्चित करण्याचा विचार आहे. मात्र, मोठ्या संख्येने असणाऱ्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा कोरोना काळात कशी घ्यायची, याचे आव्हानही आहे. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या अद्याप स्पष्ट मार्गदर्शक सूचना मिळाल्या नसल्याने शिक्षक, विद्यार्थीही गोंधळात आहेत. यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
* तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?
दहावीत मिळालेल्या गुणांवरच तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशासाठी कोणते निकष लावले जाणार, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. दहावीच्या मूल्यमापनाचा निर्णय लवकर घेतला जावा जेणेकरून इतर प्राधिकरणांना निर्णय घेणे शक्य होईल अशी मागणी होत आहे.
* ऑनलाइन सीईटी झाली तर ग्रामीण भागाचे काय?
कोरोनामुळे ऑनलाइन सीईटी घेण्याचा विचार केला तर याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव तसेच ॲण्ड्रॉइड मोबाइल अनेक विद्यार्थ्यांकडे नाहीत. यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागण्याची भीती आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले असताना अकरावी प्रवेशासारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना अडचणी येऊ नयेत अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
* ऑफलाइन सीईटी झाल्यास कोरोनाचे काय?
ऑफलाइन सीईटी परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागेल. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. पुन्हा ऑफलाइन परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* अंतर्गंत मूल्यमापन कसे होणार?
दहावीतील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन बहुतांश शाळांत झाले नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गंत मूल्यमापन कसे करायचे याच्या मार्गदर्शक सूचनाच अनेक शाळांना मिळाल्या नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. अशा सूचना मिळाल्यानंतरच मूल्यमापन करणे शक्य होईल.
* शिक्षक, प्राचार्य म्हणतात...
दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश कसा द्यायचा? याबाबत अद्याप कोणत्याही सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या नाहीत. अकरावी प्रवेशासंदर्भात ज्या सूचना मिळतील, त्यानुसार पुढील प्रक्रिया राबविली जाईल.
- सुप्रिया जाधव, प्राचार्या
अकरावीत प्रवेश देण्यासाठी कोणते तरी निकष ठरवावे लागतील. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. ऑनलाइन सीईटी घ्यायची झाल्यास सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांचा विचार होणे आवश्यक आहे.
- गजेंद्र हतकणंगले, माध्यमिक शिक्षक
* आकडेवारी काय सांगते...
२०२०-२१ अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातील एकूण जागा - ३२०७७९
एकूण महाविद्यालये - ८४३
प्रवेशित विद्यार्थी संख्या २०२०-२१ : २२४६९५
रिक्त जागा - ९६०८४
....................................