बीफ खा, किस करा; पण त्याचे फेस्टिव्हल कशाला साजरे करता?:नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 02:29 PM2018-02-19T14:29:51+5:302018-02-19T14:33:28+5:30
मी स्वतः मांसाहारी असून, कुणी काय खावं, काय खाऊ नये, ही ज्याची-त्याची आवड आहे.
मुंबई: लोकांनी बीफ खावे, एकमेकांना किस करावे, पण या सगळ्याचे उत्सव साजरे करण्याची काय गरज आहे, असा सवाल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला. ते सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
कत्तलीसाठी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर गेल्यावर्षी केंद्र सरकारने बंदी घातली होती. त्यानंतर विरोधकांकडून भाजपावर मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली होती. अनेक राज्यांतील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी बीफ पार्टीज आयोजित करून या निर्णयाचा निषेध केला होता. त्यावेळी नायडू यांनी विरोधकांवर बीफ बंदीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. मी स्वतः मांसाहारी असून, कुणी काय खावं, काय खाऊ नये, ही ज्याची-त्याची आवड आहे. काही लोक प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्यासाठी काहीही बोलत सुटले आहेत, असे नायडूंनी म्हटले होते.
त्यानंतर आज मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयात नायडू यांनी पुन्हा एकदा बीफ बंदीच्या मुद्द्यावर भाष्य केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, तुम्हाला बीफ खायचं तर खा. त्यासाठी महोत्सव कसले आयोजित करता? त्याचप्रमाणं किस फेस्टिव्हलही कशाला? जर तुम्हाला एखाद्याला किस करायचं असेल तर फेस्टिव्हल अथवा कुणाच्या परवानगीची गरज का भासते? काही लोक अफझल गुरुच्या नावाचा जप करतात. हे काय सुरू आहे? त्याने संसद उडवून देण्याचा प्रयत्न केला होता, हे लक्षात राहू द्या, असे नायडूंनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी तिरूअनंतपूरम येथील कार्यक्रमातही त्यांनी राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये, असा सल्ला दिला होता. राजकारणाचा शिरकाव धर्मात होऊ नये आणि धर्माचा प्रभाव राजकारणावर असू नये. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ईश्वर, अल्ला, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा अयप्पा यापैकी कुणाची पूजा करायची, ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले होते.
You want to eat Beef, eat. Why Festival? Similarly a Kiss Festival, if you wish to Kiss why you need a festival or anyone's permission. Then you have Afzal Guru. People chanting his name. What is happening? He tried to explode our parliament: VP Venkaiah Naidu pic.twitter.com/m9ggvoYZQA
— ANI (@ANI) February 19, 2018