पत्नीचा खून करून मुलीसोबत घेतला आइसक्रीमचा आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:15 AM2019-01-19T06:15:48+5:302019-01-19T06:15:50+5:30
ठाण्यातील प्रकार : स्वत:ही केली आत्महत्या
- जितेंद्र कालेकर
ठाणे : आपल्या पाचवर्षीय मुलीसमोर प्रथम पत्नीचा खून आणि नंतर स्वत: आत्महत्या करणाऱ्या सुनील सांगळे (४०) याने आत्महत्येपूर्वी मुलीसोबत आइसक्रीमचा आस्वाद घेतल्याचे समोर आले आहे. बुधवारी रात्री सांगळे याने पत्नी अर्चना (३५) हिचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी २.३० वा.च्या सुमारास त्याने स्वत: गळफास घेतला. या प्रकारामुळे वागळे इस्टेट, हनुमाननगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्येपूर्वी सुनीलने पत्नीच्या माहेरच्या लोकांवर आरोप करून या घटनेस त्यांना जबाबदार धरले आहे. नऊ जणांची नावे त्याने घरातील भिंतीवर लिहिली आहेत. तर, मुलीला तिच्या आजीकडे सांभाळण्यासाठी द्यावे, असेही त्याने म्हटले आहे.
आत्महत्येपूर्वी त्याने गुरुवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी अर्चना देवाघरी गेल्याचे पत्नीच्या एका नातेवाइकाला सांगितले. आणखीही एका नातेवाइकाला त्याने हेच सांगितल्यानंतर अनेकांनी त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. तो लागलाच नाही.
मुंबईमध्ये पोलीस उपनिरीक्षक असलेल्या एका नातेवाइकाने ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाकडे ही माहिती दिली. ती मिळताच श्रीनगर पोलीस ठाण्यातून दोन हवालदार, त्यापाठोपाठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील, निरीक्षक सुनील पंधरकर हे हनुमाननगरातील सांगळे यांच्या घराकडे पोहोचले. त्या वेळी आईचा खून आणि वडिलांची आत्महत्या या दोन्ही घटनांची एकमेव साक्षीदार असलेल्या त्यांच्या पाच वर्षांच्या कल्याणी या मुलीने घराचा दरवाजा उघडला. आतील दृश्य पाहून पोलिसांसह त्यांचे नातेवाइकही हादरले.
चारित्र्याच्या संशयातून कृत्य
दारूचे व्यसन असलेला सुनील रिक्षाचालक होता. त्याची पत्नी एका कॉलसेंटरच्या ठिकाणी नोकरी करत होती. त्याचा तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. दोन महिन्यांपूर्वीही त्यांच्यात अशीच भांडणे झाली होती. ती मिटवणाºया माहेरच्या लोकांनाही त्याने जबाबदार धरून त्यांची नावे स्केचपेनने भिंतीवर लिहिली आहेत. या प्रकरणी सर्वच बाजूंनी तपास केला जाणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी सांगितले.