Join us

भरपूर चॉकलेट खा अन् लहान वयातच दातात भरा सिमेंट; लहान मुलांच्या मौखिक आरोग्य समस्यांना पालक जबाबदार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 2:12 PM

गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये चॉकलेट्स, जंकफूड खाल्ल्यामुळे दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई : लहान मुलांमध्ये दात किडणे ही अतिसामान्य समस्या आहे; मात्र त्या समस्येला वेळीच रोखले नाही, तर लहान मुलांना मौखिक आरोग्याच्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे मुलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात. त्यांच्या खाण्यावर अनेक बंधने येतात. गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये चॉकलेट्स, जंकफूड खाल्ल्यामुळे दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होऊन त्यामध्ये सिमेंट भरण्याचे प्रमाण वाढले आहे; तसेच मोठ्या प्रमाणात  दंततज्ज्ञ दिसून येत आहेत.लहान मुले अनेकवेळा काही खाद्यपदार्थ खातात. त्याचे कण अनेकवेळा दातांवर चिटकून बसतात. मोठा काळ हे कण त्याच ठिकाणी राहिल्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरते; विशेष म्हणजे लहान मुलांना फारसे दात कसे स्वच्छ ठेवावेत, हे कळत नाही. यामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असते. 

दोन ते अडीच वर्षांनंतर ६ महिन्यांतून एकदा तपासणी-  त्यानंतर सहा ते बारा वर्षांत त्यांचे दुधाचे दात पडून कायमस्वरूपी दात येण्यास सुरुवात होते.  या मुलांना लहानपणापासून दातांचे आरोग्य व्यवस्थित समजून सांगितले पाहिजे. -  काही तरी दाताचा मोठा आजार झाला की, त्यांना दातांच्या डॉक्टरकडे घेऊन यायचे असा आपल्याकडे प्रघात आहे; -  मुलांच्या दातांचे आरोग्य चांगले ठेवले तर मुलांना भविष्यात होणारी मौखिक आजारापासून दूर ठेवण्यास मदत होते. दोन ते अडीच वर्षांचे बाळ झाल्यावर सहा महिन्यांतून तपासणीकरिता नेले पाहिजे.

 लहान वयातच काढावी लागतेय दाढ गेल्या काही वर्षांत दंतवैद्यकीय विश्वात मोठे आमूलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे दंततज्ज्ञांचा अलीकडच्या काळात दात वाचविता कसा येईल, याकडे ओढा असतो; मात्र काही मुलांच्या बाबतीत दात मुळापासून एवढे किडलेले आणि खराब झालेले असतात की, त्याचा दाढीवर थेट परिणाम होते. डॉक्टरांना दाढ काढावीच लागते. लहान मुलांच्या खाण्याच्या  सवयी बदलल्या आहेत. मुले थोडी रडली की, पालक त्यांना तत्काळ हवे ते खायला देतात. त्यामुळे त्या लहान मुलांच्या दातांचे आरोग्य धोक्यात येते आहे.

लहान मुलांच्या मौखिक आरोग्याच्या समस्यांना पालक जबाबदार आहेत. अनेक पालकांचे मुलाच्या दाताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष असते. इतर काही आजार झाले तर ते लहान मुलांना तत्काळ लहान मुलांच्या डॉक्टरकडे घेऊन जातात; मात्र दंतोपचार ज्ज्ञांकडे नेण्यासाठी ते वेळकाढूपणा करतात. पालकांनी मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. दिवसातून दोनदा व्यवस्थित मुलाकडून ब्रश करून घेतल्यास अर्धे आजार कमी होतील. दातांची नियमितपणे तपासणी केल्यास वेळीच उपचार घेऊन दात वाचविता येतो. दातांतील कीड काढल्यानंतर फिलिंग करावे लागते. त्यावेळी सिमेंटचा वापर केला जातो.- डॉ. आकाश अकिनवार, दंतवैद्यक

टॅग्स :आरोग्यडॉक्टर