तज्ज्ञांचा सल्ला; ॲण्टीऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आढळते तसेच आंबा हा ॲण्टीऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत असल्याने कोविडमधून बरे होण्यास त्याची खूप मदत होते, असे डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या महाविद्यालयाच्या उद्यान शास्त्राचे सहाय्यक अध्यापक डॉ. महेश कुलकर्णी यांनी सांगितले.
महेश कुलकर्णी म्हणाले की, कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या अनेक तंत्रज्ञानांमुळे आंब्याचा कोकणातच नव्हे तर देशातही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. कोकण कृषी विद्यापीठाने नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कलमांची निर्मिती करून आंब्याखालचे क्षेत्र वाढविण्यात तसेच कृषी शिक्षण व माळी प्रशिक्षण यांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्मिती करून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी हातभार लावला आहे.
१९९० साली पन्नासच्या आसपास असलेली कोकणातील नर्सरींची संख्या आज पाचशेहून अधिक झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ४० हजार हेक्टरवर असलेले आंब्याखालील क्षेत्र वाढून जवळजवळ ४ ते ५ लाखांपर्यंत पोहोचले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळाली आहे. आंबा हे एकमेव असे पीक आहे जे जात सांगून विकत घेतले जाते. त्यामुळे एकाच जातीवर अवलंबून न राहता, विविध जातींचा आस्वाद, त्यांची वैशिष्ट्ये ग्राहकांनी जाणून घेणे आवश्यक आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
* फसवेगिरीला आळा बसेल
आंब्याच्या प्रकारांमधील ‘देवगड हापूस’ हा खूप नाजूक जातीचा आंबा असल्याने मोहोर आल्यानंतर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कोविडमुळे गतवर्षी टाळेबंदीच्या काळात मोठे नुकसान झाले. आता आमचे ६० टक्के उत्पादन बाग ते ग्राहक असे थेट जाते. कमी हाताळणी आणि बॉक्सच्या सॅनिटायझेशनमुळे ग्राहक आंबे घेतात. लवकरच सर्व देवगड हापूस बागायतदारांना भौगोलिक मानांकन प्रमाणपत्रे मिळतील. त्यामुळे आंबा विक्रीत होणाऱ्या फसवेगिरीला आळा बसेल.
- कुलदीप जोशी, आंबा उत्पादक बागायतदार, देवगड, सिंधुदुर्ग
--------------------------