मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील स्थिती दिवसागणिक आणखीच वाईट होत आहे. कोरोनाचा विळखा आणखी वाढत असून, कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. मात्र असे असले तरीदेखील मुंबईकरांनी हार मानलेली नाही. प्रत्येक मुंबईकर घरात बसून कोरोनाशी लढत आहे. मात्र अजूनही काही मूठभर लोकांकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. परिणामी एकाची शिक्षा इतरांना भोगावी लागेल. या कारणात्सव अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या घरातली मीठ भाकरी खा पण घराबाहेर पडू नका, असे आवाहन कोरोनाशी दोन हात करत असलेल्या मुंबापुरीतल्या नगरसेवकांकडून मुंबईकरांना केले जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपआपल्या विभागातील समस्या सोडविण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकरांकडून आपल्या नगरसेवकांना फोन केले जात असून, विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका नगरसेवकाला दररोज दोनशेहून अधिक फोन मदतीसाठी येत आहोत. या फोनमध्ये स्वच्छता करून देणे, अन्नधान्य पुरविणे, जनजागृती करणे; अशा अनेक मुद्यांचा समावेश आहे.मुंबापुरीतल्या वरळी कोळीवाड्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात अधिक आहे. त्यानंतर धारावीला कोरोनाने विळख्यात घेतलेले आहे. त्या खालोखाल दहिसर, भायखळा, वांद्रे येथील झोपड्यांत कोरोना पसरण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुंबईकरांनी देखील हार मानलेली नाही. गो कोरोना गो म्हणत कोरोनाला थोपविले आहे. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. घरात बसून सरकारला सहकार्य केले जात आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वत: अनेक ठिकाणी दाखल होत मुंबईकरांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. या खालोखाल प्रत्येक ठिकाणचे नगरसेवक आपआपल्या विभागात कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेत आहेत. पूर्व उपनगरात मुलुंड परिसरात राहणारा सागर देवरे नावाचा तरुण ज्येष्ठ नागरिकांना मदत करत आहे. जीवनाश्यक साहित्य आजी-आजोबांना आणून दिले जात आहे. येथील ज्येष्ठ नागरिकांना जी काही मदत लागत आहे; ती मदत केली जात आहे. विशेषत: ही मदत करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जात आहे. पूर्व उपनगरातील घाटकोपर येथील लोकप्रतिनिधी राम कदम हेदेखील गरजूंना अन्नदान करत आहेत. समाज माध्यमांचा वापर करत गरजूंपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.कुर्ला येथील मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी गेल्या दोन दिवसांत पाचशे लोकांना अन्नधान्यांचे वाटप केले आहे. यापूर्वी शक्य त्या ठिकाणी जंतुनाशकांची फवारणी केली आहे. येथील इमारती, चाळी, झोपडया पिंजून काढल्या आहेत. लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन केले आहे. आता ५०० गरजू व्यक्तींना गेल्या दोन दिवसांत अन्नधान्याचे वाटप केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्नधान्य वाटप केल्यानंतर आता लोकांकडून भाजीपाल्याची मागणी केली जात आहे. प्रत्येक गोष्ट पुरविणे शक्य होत नाही. जे शक्य आहे ते पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र लोकांनी घराबाहेर पडू नये. एकवेळ घरातली मीठ भाकरी खा. पण घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन तुर्डे यांनी केले आहे. कुर्ला येथील लोकप्रतिनिधी मंगेश कुडाळकर हेदेखील लोकांना परिसर बंद करण्याचे आवाहन करत आहेत. केवळ वैद्यकीय सेवांसाठी बाहेर पडण्याचे आवाहन करत आहेत. धारावी येथील लोकप्रतिनिधी वर्षा गायकवाड धारावीकरांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहोत. आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील लोकप्रतिनिधी राहुल शेवाळे आरोग्य सेवा पुरवित आहेत. त्यांनी येथे स्क्रीनिंग सुरु केले आहे.दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळक रलोकांना समाज माध्यमांद्वारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पश्चिम उपनगरातील कोरोनाची संख्या वाढत असल्याने लोकांना अधिकाधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे . मालाड येथील समाजसेवक विनोद घोलप देखील पोलीसांना मास्कचे वितरण करत आहेत. सॅनिटायर्झसचे वितरण करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन केले जात आहे. शिवसेना शाखा ५२ मध्ये शिवसैनिकांच्या माध्यमातून नुकतेच ५०० कुटूंबांना जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले, अशी माहिती शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी दिली. विशेषत: पश्चिम उपनगरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने येथील आरोग्याबाबत अधिकाधिक काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.