लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना असलेल्या धोक्याचा आढावा घेऊनच सुरक्षेत कपात केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. आपली सुरक्षा पूर्ववत करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावे, यासाठी राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या या याचिकेवर ठाणे पोलिस उपायुक्त शशिकांत परोपकारी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. विचारे यांच्या जिवाला किती धोका आहे, याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतरच त्यांच्या सुरक्षेची व्याप्ती आणि कालावधी ठरविण्यात आला, असे पोलिस उपायुक्तांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
पोलिस आयुक्त, ठाणे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस उपायुक्त (एसबी) यांच्यासह विविध प्राधिकरणांशी सल्लामसलत करूनच विचारे यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. शशिकांत परोपकारी यांनी विचारेंनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.