दिवाळीत गोड खाताय? मिठाई खरेदी करताना राहा सतर्क, गिरगावातून भेसळयुक्त मिठाई जप्त
By स्नेहा मोरे | Published: November 9, 2023 07:18 PM2023-11-09T19:18:57+5:302023-11-09T19:19:23+5:30
Mumbai: सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे प्रमाण सर्रास वाढते. परिणामी, या खाद्यपदार्थांमुळे सामान्याच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई - सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे प्रमाण सर्रास वाढते. परिणामी, या खाद्यपदार्थांमुळे सामान्याच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारपेठांमधून मिठाई वा अन्य खाद्यपदार्थांची खरेदी करताना ग्राहकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. नुकतेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गिरगाव परिसरातील काळबादेवी येथील श्री गणेश भंडार या दुकानात छापा टाकून सुमारे ३ लाख ८४ हजारांचा काजूचा साठा जप्त केला आहे.
या दुकानातील विक्रेते शंतनू पटनाईक असून त्यांनी उत्पादनांची चुकीची जाहीरात , निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ वापरल्याप्रकरणी ही कारवाई कऱण्यात आली आहे. कारवाईत ३ लाख ७४ हजार ६४० रुपयांचा काजूचा ६६९ किलो आणि १० हजार ६४० रुपयांचा काजूचा १९ किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी आर.जे.जेटके, वाय.एस. सावंत आणि एस.एस. सावंत यांच्या चमूने केली आहे.
कारवाईदरम्यान, केसर काजू कतली, मोतीचूर लाडू, खाद्यतेल, शेव, काजू, बदाम कतली , बेसन या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असून दोष आढळल्यास पुढील कठोर कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त अन्न शैलेश आढाव यांनी दिली आहे.