Join us

देवरांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, शिवसेनेविरोधातील 'ते' विधान भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 3:07 PM

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा असं पत्र एल टी मार्ग पोलीस ठाण्याला दिले आहे.

मुंबई - महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा असं पत्र एल टी मार्ग पोलीस ठाण्याला दिले आहे. 4 एप्रिल रोजी झवेरी बाजार येथे व्यापारांशी संवाद साधताना मिलिंद देवरा यांनी जैन समाजाला भडकविण्याचा प्रयत्न करणारं विधान केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. 

शिवसेना अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे. काही वर्षापूर्वी शिवसेनेने पर्युषण काळात जैन मंदिराच्या समोर मांसाहर शिजवत जैन धर्मांचा अपमान केला होता. ही घटना तुम्ही विसरु नका, मतदानाच्या माध्यमातून शिवसेनेला धडा शिकवा असं आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी अल्पसंख्याक समुदायाला केलं होतं. या विधानाविरोधात शिवसेना उमेदवारांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली होती. देवरा यांच्या भाषण तपासल्यानंतर प्रथमदर्शनी मिलिंद देवरा यांच्याकडून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी सूचना निवडणूक आयोगाने पालिसांना दिल्या आहेत. 

मिलिंद देवरा यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा जैन कार्डचा वापर काँग्रेस करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. व्यापारी बांधव मोदींच्या नावावर शिवसेनेला मत देतील असा शिवसेनेचा समज आहे. तो दूर करा, शिवसेनेचे उमेदवार प्रचारासाठी येतील तेव्हा त्यांना जाब विचारण्याचं काम करा, मतपेटीच्या माध्यमातून त्यांना उत्तर द्या असंही मिलिंद देवरा यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. 

Video: 'शिवसेनेनं जैन समाजाचा अपमान केला हे विसरु नका, त्यांना धडा शिकवा'

दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून अरविंद सावंत निवडणूक लढवत आहे. दक्षिण मुंबईत जैन समाजाची मते महत्त्वाची आहेत. त्यामुळे जैन मतं काँग्रेसच्या पारड्यात पाडण्यासाठी मिलिंद देवरा यांनी प्रक्षोभक विधान करुन मतं मिळविण्याचा केविळवाणा प्रयत्न केल्याचं शिवसेनेकडून आरोप होत होता. 

काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे संजय निरुपम यांच्याकडून काढून मिलिंद देवरा यांना देण्यात आली आहेत. मागील काही वर्षांपासून पर्युषण पर्वाच्या काळात मुंबई आणि आसपासच्या काळात मांसबंदीचा मुद्दा गाजताना दिसला आहे. भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेतील पर्युषण काळात आठ दिवस मांसविक्री बंदीचा निर्णय घेतला होता. यावरुनही अनेक वाद निर्माण झाले होते.  

टॅग्स :लोकसभा निवडणूककाँग्रेसभारतीय निवडणूक आयोगशिवसेना