Join us  

डॉकयार्ड रोड ते सीएसटी रेल्वे प्रवास होणार एलिव्हेटेड

By admin | Published: February 16, 2016 3:53 AM

मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील सीएसटी ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या नवीन मार्गासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या मार्गासाठी हार्बरची जागा उपलब्ध करून देतानाच डॉकयार्ड रोड ते सीएसटीपर्यंत

सुशांत मोरे, मुंबईमध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील सीएसटी ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या नवीन मार्गासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या मार्गासाठी हार्बरची जागा उपलब्ध करून देतानाच डॉकयार्ड रोड ते सीएसटीपर्यंतचा संपूर्ण हार्बर रेल्वेमार्ग एलिव्हेटेड (उन्नत) करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यावर सध्या काम सुरू असून शासनाकडेही या जागेसाठी बोलणी सुरू आहे.एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर सीएसटी ते कुर्ला पाचवा आणि सहावा नवीन मार्ग बनविला जाणार आहे. सध्या कुर्ला ते कल्याणपर्यंत पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. सीएसटीपर्यंत पाचवा-सहावा मार्ग उपलब्ध झाल्यास लांब पल्ल्याबरोबरच लोकलचा प्रवासही सुकर होणार आहे. तथापि, सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग पूर्ण करण्यासाठी रेल्वेला जागेची उपलब्धता ही सर्वात मोठी अडचण आहे. सॅण्डहर्स्ट रोड ते सीएसटीपर्यंत जागेअभावी मध्य रेल्वेने यावर एक नवा पर्याय शोधला आहे. पाचव्या-सहाव्या नव्या मार्गासाठी मध्य रेल्वेने हार्बरवरील सॅण्डहर्स्ट रोड ते सीएसटीपर्यंत सध्याचे दोन्ही मार्ग उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गाला डॉकयार्ड रोडपासून वळवून पी.डिमेलो रोडमार्गे नेले जाईल आणि त्यानंतर कर्नाक बंदरहून सीएसटीला या मार्गाचा शेवट केला जाईल. मात्र हार्बरचा हा शेवट सीएसटीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात पी.डिमेलो रोडला असेल. त्यामुळे सीएसटी हार्बरवरील सध्याचे दोन प्लॅटफॉर्म बंद करून ते पी. डिमेलो रोडकडे हलवले जातील. या मार्गासाठी एकूण ८९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.हार्बरवरील डॉकयार्ड रोड आणि सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन ही स्थानके सध्या एलिव्हेटेड आहेत. मात्र मस्जिद ते सीएसटीपर्यंत एलिव्हेटेड मार्ग नसून हादेखील मार्ग एलिव्हेटेड होईल. त्यामुळे हार्बरवासीयांना सीएसटीत (पी. डिमेलो रोड दिशेला) एलिव्हेटेड स्थानक मिळेल.