सरकत्या जिन्यांचे ‘ग्रहण’ सुटता सुटेना, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:27 AM2020-02-20T03:27:27+5:302020-02-20T03:28:07+5:30
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकत्या जिन्यांसाठी २७९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे
मुंबई : काही दिवसांपूर्वी अंधेरी रेल्वे स्थानकावर सरकता जिना उलट्या बाजूने फिरल्याने दोन प्रवासी जखमी झाले. त्यावेळी प्रवाशांची धक्काबुक्कीही झाली. दोन वर्षांपूवी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरी घटनाही ताजी आहे. त्यामुळे पूर्वी जिन्यामुळे आणि आता सरकत्या जिन्यामुळे चेंगराचेंगरीच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकत्या जिन्यांसाठी २७९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सध्या बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांना एक वर्षही पूर्ण झाले नाही, तरीही अशा घटना घडत आहेत. १८ फेब्रुवारी रोजी अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर सरकत्या जिन्याच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला. परिणामी, प्रवासी चढत असताना जिना वरच्या दिशेने जाण्याऐवजी अचानक खालच्या दिशेने गेला. यात दोन प्रवासी जखमी झाले. अनेक वेळा सरकते जिने बंद असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, दिव्यांग प्रवासी यांना जिना चढून जावे लागते.
रेल्वे प्रशासन सरकत्या जिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीवर दुर्लक्ष करत आहेत. एका वर्षात सरकते जिने बिघडत आहेत. त्यामुळे या सरकत्या जिन्यांच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित होते. गर्दीच्या स्थानकावर उत्तम दर्जाचे सरकते जिने बसविले पाहिजेत.
- मधू कोटियन,
सदस्य, विभागीय
रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती
रेल्वे प्रशासन प्रवाशांचा जीव जाण्याची वाट बघते. त्यानंतर सुविधा पुरविते. सरकत्या जिन्यांमुळे मोठी चेंगराचेंगरीची घटना होण्याची भीती आहे. त्यामुळे वेळीच प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे.
- राजीव सिंघल, रेल्वे प्रवासी
सरकत्या जिन्यांच्या अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. सरकत्या जिन्यांची क्षमता मुंबईलोकल प्रवाशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे चांगल्या क्षमतेचे सरकते जिने बसविणे आवश्यक आहे.
- सुभाष गुप्ता,
अध्यक्ष, रेल्वे यात्री परिषद