मुंबई :कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे अनेकांवर, गणेशभक्तांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या दृष्टिकोनातून मंडळांसह गणेश भक्तांना कर्तव्य म्हणून एक हात मदतीचा पुढे करण्यात आला आहे. या माध्यमातून इको फ्रेंडली मूर्ती सोबत, कुंडी, तुळशीचे रोप दिले जात आहे. जोगेश्वरीमधील विकलांग मुलांना प्रोत्साहन दिले जात असून, या उपक्रमासाठी मंडळानी सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केला आहे.
शामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जोगेश्वरी पूर्व, मरोळचा मोरया अंधेरी पूर्व, विलेपार्लेचा राजा विलेपार्ले पूर्व, मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जोगेश्वरी पूर्व, खेरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वांद्रे पूर्व, गुंदवलीचा मोरया अंधेरी पूर्व, पिंपळेश्वर मंडळ बांद्रेकर वाडी जोगेश्वरी पूर्व, बांद्रेकर वाडी मित्र मंडळ जोगेश्वरी पूर्व, अभिषेक प्रकाश मडव विलेपार्ले पूर्व या मंडळाचा यात समावेश आहे. यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, शामनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मेघवाडी जोगेश्वरी पोलीस ठाणे तसेच संपूर्ण पोलीस यंत्रणा, सागर मंडप डेकोरेटर यांनी मदत केली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती काेविड दल सदस्य कल्पेश राणे यांनी दिली.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाचा विचार करून दादर येथील अमरशक्ती क्रिडा मंडळाने बांधलेल्या कृत्रिम तलावाला दिड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन तलावात करून विभागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी तलावात विसर्जन करणाऱ्या कुटुंबाना भेट वस्तू ही देण्यात आल्या. हा तलाव गणेशोत्सवच्या अकराही दिवस विसर्जनासाठी उपलब्ध असणार आहे.