मुंबई : गणेशोत्सवामध्ये पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी अनेक मंडळे हा उत्सव इको फ्रेंडली साजरा करण्यावर भर देत आहेत. मुंबईचा महाराजाधिराज अशी ख्याती असणाऱ्या साकीनाक्याच्या परेरावाडी येथील ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाने यंदा आपल्या बाप्पाची मूर्ती व संपूर्ण मंडपातील सजावट इको फ्रेंडली करण्यावर भर दिला आहे.
या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती ही कागदाच्या लगद्यापासून बनविण्यात आली असून, ती साकारण्यासाठी चवळी, तूर, मसूर या कडधान्यांचा वापर करण्यात आला आहे. या मंडळाच्या मखराची सजावटदेखील कागद व पानांच्या पत्रावळीचा वापर करून केली आहे. मूर्तिकार राजेश दिगंबर मयेकर यांनी ही मूर्ती साकारली आहे.
मागच्या वर्षीदेखील या मंडळाने मायक्रो गणेशा ही संकल्पना समोर ठेवून ९ मिलिमीटर उंचीची डोळ्यांनी सहजपणे न दिसणारी गणेशमूर्ती पेन्सिलच्या टोकावर कोरीव काम करून साकारली होती. ही गणेशमूर्ती मुंबईतील सर्वांत लहान उंचीची उभी मूर्ती होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मंडळाने यंदाही आपल्या विभागात आरोग्यविषयक उपक्रम राबविले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश चंद्रकांत खानविलकर यांनी दिली.