लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लाडक्या गणरायाचे आगमन महिन्याभराने होणार असून, आतापासूनच त्याची लगबग सुरू झाल्याचे दिसत आहे. पर्यावरणपूरक बाप्पाच्या मूर्तीसाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू असून, यंदा प्रथमच पालिकेकडून मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईतील बी वॉर्ड वगळता इतर २३ वॉर्डांत प्रत्येकी ६७२ टन माती वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा घरोघरी पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान होणार आहे.
निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या वतीने सातत्याने विविधस्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे. याच अंतर्गत या वर्षी घरगुती स्तरावरील श्रीगणेश मूर्ती या ४ फूट उंचीपर्यंतच्याच असणे व त्या केवळ शाडूच्या मातीच्या किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार करणे पालिकेने बंधनकारक केले आहे. पर्यावरणपूरक साहित्यापासून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या वर्षी प्रायोगिक स्तरावर शाडूची माती तसेच मूर्ती घडविण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर जागा नि:शुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे २४०० मेट्रिक टन शाडूची माती पालिकेने मागविली असून, २३ वॉर्डना प्रत्येकी ६७२ टन शाडूची माती वितरित करण्यात आली आहे. बी वॉर्डकडून अद्याप शाडूच्या मातीबाबत मागणी करण्यात आलेली नाही, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.