मुंबई : सुमारे चार कोटी रुपये खर्च करून माहिमच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील असा माहिम समुद्रकिनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. महापालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या वतीने माहिम समुद्रकिनारी पर्यावरणपूरक असे सौंदर्यीकरण करण्यात आले असून, देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण आता खुले झाले आहे.
माहिम रेतीबंदर अवजड वाहनांच्या अनधिकृत वाहनतळाने व्यापला होता. किनाऱ्याच्या उत्तरेकडील भाग बांधकामे, झोपड्यांमुळे बाधित होता. दक्षिणेस माहिम पोलीस वसाहतीची भिंत मोडकळीस आली होती. कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे नुकसान झाल्याने किनाऱ्याची धूप होण्यापासून रोखण्याचे आव्हान होते. समस्यांचा विचार करता, तोडगा काढण्यासाठी समुद्रकिनारा सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला.
प्रकल्प लोकार्पणदरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर मिलिंद वैद्य, माजी महापौर श्रद्धा जाधव, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, उपायुक्त हर्षद काळे, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर उपस्थित होते.
संरक्षक भिंतीवर चित्रे रेखाटली
सर्वप्रथम सुशोभिकरणास बाधित होत असलेल्या पाच झोपडीधारकांना पर्यायी जागा देण्यात आली. कचरा तसेच नको असलेले दगड हटविण्यात आले. धूप होऊ नये, यासाठी किनाऱ्यावर ५ फूट उंचीपर्यंत वाळू पसरविण्यात आली. कोस्टल रोडच्या कामातून उपलब्ध वाळू आणल्याने महापालिकेवर वेगळा भार पडला नाही. किनारा संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यात आली असून भिंतीवर चित्रे रेखाटण्यात आली. तळहातामध्ये झाड जपल्याचे शिल्प साकारण्यात आले आहे. किनाऱ्यावर झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये वादळी हवेचा वेग कमी करण्याची क्षमता असणारे सुरु या झाडाच्या २०० रोपांची लागवड आहे.
३० मीटर उंचीचा निरीक्षण मनोरा
टिकोमाची ३५० आणि चाफ्याची २०० तर बांबूची ३०० रोपे लावण्यात आली. किनाऱ्याभोवती बांबूचे कुंपण लावण्यात आले. व्यायाम करण्यासाठी लावण्यात आलेले साहित्य व उपकरणे लाकडापासून बनविलेले आहे. किनाऱ्यावर दगडाची पायवाट आहे. परिसर न्याहाळता यावा म्हणून ३० मीटर उंचीचा निरीक्षण मनोरा उभारण्यात आला आहे. मनोऱ्यावरून वांद्रे-वरळी सागरी सेतूसह अरबी समुद्राचे दृश्य पाहता येते.