मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनीही आपापली जबाबदारी ओळखून साध्या पद्धतीने उत्सव साजरा करत आहेत. अनेक मोठमोठ्या मंडळांनीही यावर्षी ४ फूटाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करुन सामाजिक भान जपत आहेत. पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व येथील श्री साई श्रद्धा सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यावेळी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे.
मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक ‘गुंदवलीचा मोरया’ गणपती यावर्षी इकोफ्रेंडली सजावटीत बसवण्यात आला आहे. घरोघरी वर्गणी न मागता यंदा रद्दी पेपर जमा करुन मंडळाने इकोफ्रेंडली देखावा बनवला आहे. यामध्ये पर्यावरणपूरक मातीचा बाप्पा बसवून मंडळाने सामाजिक भान जपलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने येत्या २९ ऑगस्टला अंधेरीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी संतोष सावंत यांनी दिली.
तसेच मंडळाच्या वतीने यंदा परिसरातील नागरिकांसाठी कृत्रिम तलावदेखील उभारला आहे. २३ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत मंडळाच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगचं पालन करुन मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं.
दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन नुकतेच सुरळीत पार पडले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा पालिकेने मुंबईत यंदा १६७ ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत. कोरोनामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांनी यंदा दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास पसंती दिली असून पश्चिम उपनगरात कृत्रिम तलाव संकल्पनेला मिळाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे.