मुंबई : पाळीव व भटके प्राणी आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी अंत्यविधीची सुविधा मुंबई पालिकेकडून विनामूल्य आणि शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक अशा पद्धतीने करून दिली आहे. यामुळे नैसर्गिक वायूवर आधारित दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे. मालाड पश्चिमेला कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथील केटल पाँड कार्यालय येथे ५० किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित ही दहन व्यवस्था असून नैसर्गिक वायू (पीएनजी) आधारित हे दहन होणार असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.
प्राणिमित्रांकडून मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त दहन सुविधेसाठी मागणी होत होती, त्याची पूर्तता या माध्यमातून झाली आहे. या दहन व्यवस्थेसाठी इंधन स्वरूपात वायू पुरवठ्याची सुविधा ही महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, लवकरच याठिकाणी लहान पाळीव प्राण्यांचे शवागारचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले. ही सुविधा मालाडमध्ये उपलब्ध असली तरी पश्चिम उपनगरासह संपूर्ण मुंबईतील प्राणिप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी करता येणार आहे. रोज सकाळी १० ते ६ या कालावधीत ही सुविधा विनामूल्य मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा व सहजपणे उपयोग होईल. मुंबईतील प्राणिमित्र आणि नागरिक यांनी लहान पाळीव प्राण्यांचा शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यविधी होण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा, असे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले. या दहन व्यवस्थेची पाच वर्षांची देखभाल व प्रचालन व्यवस्था ही मे. अनिथा टेस्ककॉट इंडिया प्रा. लि. यांच्याकडे सोपविल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
कशी असणार व्यवस्था ? प्राणी दहन करण्यासाठी पालिकेचे किंवा खासगी नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. पाळीव प्राणी (श्वान) असल्यास पालिकेची श्वान परवानगी आवश्यक आहे. नागरिकांनी ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड/ पॅनकार्ड/ वाहन परवाना, रेशनकार्ड यापैकी एक व पत्त्याच्या पुराव्यासाठी पासपोर्ट, वाहन परवाना, वीज देयक, पाणी देयक यापैकी एक सादर करणे आवश्यक. प्राणिप्रेमी असतील तर भारतीय जीवजंतू मंडळाने दिलेले कोणतेही एक ओळखपत्र सादर करावे.