इको-फ्रेंडली गणेशमूर्तींच्या अनुदानाबाबत चालढकल
By Admin | Published: July 11, 2015 11:51 PM2015-07-11T23:51:42+5:302015-07-11T23:51:42+5:30
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून जनजागृतीवर कोटयवधीचा निधी उधळणारे शासन इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना अनुदान देण्याबाबत
मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून जनजागृतीवर कोटयवधीचा निधी उधळणारे शासन इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना अनुदान देण्याबाबत मात्र चालढकल करत आहे. शाडूच्या मूर्तींसाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी बृहृन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून वारंवार करण्यात येत असूनही, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नव्याने सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने तरी इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या अनुदानाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे समितीचे म्हणणे आहे. शाडूच्या मुर्ती साकारण्यासाठी एका मूर्तीमागे मूर्तीकाराला किमान ५०० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले. गोवा सरकार तेथील गणेशमूर्तीकारांना शाडूच्या एका मूर्तीमागे मूर्तीकाराला १०० रुपये एवढे अनुदान देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही याबाबत पुढाकार घेवून शाडूच्या मूर्तींसाठी अनुदान द्यावे, यासाठी दहिबावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली असून, आता समिती सकारात्मक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील घरगुती गणेशमूर्तींची संख्या १ लाख ८६ हजारांच्या घरात आहे. आणि त्यातील शाडूच्या मातीच्या मूर्तींचा आकडा जेमतेम ३० ते ४० हजारांच्या घरात आहे. तर गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांची संख्या सुमारे १ हजार ४०० एवढी आहे. मुंबई आणि उपनगरात साकारण्यात येणाऱ्या सर्वच गणेशमूर्ती प्लॅस्टर आॅफ परिसच्या असतात. तर पेणमध्ये ज्या शाडूच्या गणेशमूर्ती साकारल्या जातात; त्यांच्यासाठी राजस्थानातून माती आणली जाते. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणून सर्वच गणेशमूर्ती शाडूच्या साकारण्यात याव्यात, यासाठी समितीने पूर्वीपासून पुढाकार घेतला आहे. परंतू शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणे फार खर्चिक असते. शिवाय त्यासाठीची माती उपलब्ध होत नाही. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीशी शाडूच्या मातीच्या मूर्तीची तुलना केली असता शाडूच्या मातीची मूर्तीची किंमत चौपट आहे. म्हणजे प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती ५०० रुपयांना असेल तर शाडूच्या मातीच्या मूर्तीची किंमत किमान २ हजार ५०० रुपये एवढी आहे. एवढया महाग मूर्ती साकारणे मूर्तीकाराला परवडत नाही, असे दहिबावकर म्हणाले.