पर्यावरणपूरक गणेशोत्सव पुढच्या वर्षी तरी होईल?

By सीमा महांगडे | Published: September 23, 2024 08:21 AM2024-09-23T08:21:47+5:302024-09-23T08:21:57+5:30

पीओपी पीओपी गणेशमूर्तीवरील बंदी चार वर्षांहून अधिक काळ उलटला तरी होऊ शकली नाही

Eco friendly Ganeshotsav will be next year | पर्यावरणपूरक गणेशोत्सव पुढच्या वर्षी तरी होईल?

पर्यावरणपूरक गणेशोत्सव पुढच्या वर्षी तरी होईल?

यंदा ऐन गणेशोत्सवात पीओपी गणेशमूर्तीवरील बंदीचा विषय चर्चेला आला आणि मूर्तिकारांसह, विक्रेते आणि भाविक सगळ्यांच्याच काळजात धस्स झाले. ऐन उत्सवातील गणेशमूर्ती म्हणजे कुणाच्या पोटापाण्याचा, तर कुणाच्या भावनांचा विषय, पण याच्याशीच निगडित पर्यावरण प्रदूषणावर सर्रास होणारे दुर्लक्ष काळजीचा विषय नाही का? हा प्रश्न उपस्थित होतो. पीओपी पीओपी गणेशमूर्तीवरील बंदी चार वर्षांहून अधिक काळ उलटला तरी होऊ शकली नाही. प्रश्न उपस्थित होताच प्राधिकरणांकडून फक्त एकमेकांकडे बोटे दाखवली जातात आणि नेमेचि येतो गणेशोत्सव म्हणत सण दणक्यात साजरा होतो. आता पुढच्या वर्षी तरी या निर्णयाची अंमलबजावणी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी प्रदूषणकारी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्तीचे उत्पादन, साठवणूक तसेच विक्रीवर बंदी घातली. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) बंदी घातली. त्यावर उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये शिक्कामोर्तब केले. मात्र, गणेशोत्सवात विक्रीस उपलब्ध असलेल्या गणेशमूर्तीमध्ये ९० टक्के मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. गणेशोत्सव जवळ येताच सरकार पीओपी बंदीबाबत केवळ फार्स करते. मात्र, प्रत्यक्षात बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही, याकडे यंदा याचिकेद्वारे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनात हानिकारक ठरणाऱ्या या मुद्द्यावर न्यायालयाकडून पुन्हा विचारणा झाली. मात्र, परिस्थिती 'जैसे थे' अशीच यंदाही दिसून आली. 

मुंबई महापालिकेकडून शाडूच्या मातीपासून ते जागेपर्यंत साहित्य पुरवून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. पालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सवासातील ५०० हून अधिक टन शाडू माती मूर्तिकारांना पुरविण्यात आली. शिवाय शाडू मातीच्या मूर्ती घरपोच वितरणासाठी ऑनलाईन खरेदी माध्यमांशी संपर्क साधून समन्वयही साधला. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी मागील वर्षीपेक्षा कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ केली. त्यामुळे २ लाखांपैकी ९० हजारांहून अधिक मूर्तीचे विसर्जन मुंबईकरांनी कृत्रिम तलावात करण्यास पसंती दिली. शिवाय अनेक सार्वजनिक मंडळांत व घरगुती गणेशमूर्तीसाठीही पर्यावरणपूरक मूर्तीची निवड अनेकांनी केल्याचे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने लवकरच मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होईल, अशी अपेक्षा आहे.
 

Web Title: Eco friendly Ganeshotsav will be next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.