मुंबई - गणरायाच्या आगमनाने प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण आहे. गणपती बाप्पा कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणायचे काम करतो. गणेशोत्सवातपर्यावरणपूरक सजावट करण्याकडे अनेकांचा कल असतो. अनेक ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जातो. विले पार्ले येथे राहणाऱ्या विनोद तुकाराम परब यांनी देखील पर्यावरणाचे संगोपन हा एकमेव उद्देश समोर ठेवून पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. पुण्यातील प्रसिद्ध शनिवार वाड्याची प्रतिकृती यंदा त्यांनी तयार केली आहे. परब कुटुंबीय दरवर्षी वेगवेळ्या राज्यातील गड-किल्ले यांचे देखावे तयार करत असतात. यंदाचं गणपती बसविण्याचं व देखावा साकारण्याचं त्यांचं 42 वर्ष आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील शनिवार वाडा या ऐतिहासिक वास्तुचा सुंदर देखावा साकारला आहे.
शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी वाडा संस्कृती माहीत नाही. त्यामुळे शनिवार वाडा कसा आहे?, कुठे आहे? याची माहिती मिळावी तसेच आपले गड, किल्ले, वाडा यांची ऐतिहासिक महती, संस्कृती आणि इतिहासाचा आदर कसा करावा, त्यांच्या मनात याबाबत आवड निर्माण व्हावी आणि पर्यावरणाचे संगोपन हा उद्देश असल्याने शनिवार वाड्याची इकोफ्रेंडली प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारल्याची माहिती विनोद परब यांनी दिली आहे.
शनिवार वाडा हा संपूर्ण बांबूच्या लहान व मोठ्या काठ्या, रद्दीतील पेपर, पुठ्ठे व लाकडांचा भुसा अशा साहित्यापासून साकारण्यात आला आहे. केवळ सर्वांच्या मदतीने 12 दिवसांमध्ये ही प्रतिकृती उभारली गेली. साकारलेल्या वास्तुचे क्षेत्रफळ हे 7.6 फूट लांब व 3 फूट रुंद आणि 5.6 इंच असे आहे. तसेच शनिवार वाड्यासाठी एकूण 6,500 बांबूच्या काठ्या लावून हा देखावा तयार झाला. ही प्रतिकृती साकारण्यासाठी चाळीतील मित्र मंडळींनी व घरातील महिलांनी खूप मदत केली आहे. सर्वांच्या मनात गणपती बाप्पांबद्दल असलेली श्रद्धा व त्यांचा आशीर्वाद तसेच शनिवार वाड्याबद्दल असलेला आदर, आवड आणि घरातील मंडळी आणि मित्रांनी केलेल्या मदतीमुळे हा देखावा साकारण्यात यशस्वी झाल्याचं विनोद परब यांनी सांगितलं आहे.