पर्यावरणपूरक टॅक्सीबोट लवकरच मुंबई, दिल्ली विमानतळावर दिसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:26 AM2018-07-24T03:26:51+5:302018-07-24T03:27:17+5:30
विमानांना पार्किंगमध्ये नेण्यासाठी व धावपट्टीवर नेण्यासाठी लवकरच पर्यावरणपूरक टॅक्सीबोट वापरण्यात येणार
मुंबई : मुंबई व नवी दिल्ली या देशातील आघाडीच्या दोन विमानतळांवर विमानांना पार्किंगमध्ये नेण्यासाठी व धावपट्टीवर नेण्यासाठी लवकरच पर्यावरणपूरक टॅक्सीबोट वापरण्यात येणार आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे.
इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने या सेमी रोबोटिक वाहनांची निर्मिती केली आहे. यात हे वाहन विमानाला जोडले जाते व विमानाच्या वैमानिकाद्वारे त्याचे संचलन केले जाते. एरोब्रिजपासून विमानाला धावपट्टीवर नेईपर्यंतचा प्रवास या वाहनाच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे. २०१८ च्या एअर शोमध्ये याचे सादरीकरण करण्यात आले होते. यासाठी गुरूग्राम येथील एका एव्हिएशन कंपनीसोबत करार करण्यात आला असून त्या माध्यमातून भारतात ही वाहने आणली जातील. या टॅक्सीबोटचा देशातील सर्व विमानतळांवर वापर केल्यास पुढील पाच वर्षांत तब्बल दीड बिलीयन डॉलर्सची बचत होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील त्याचा मोठा लाभ होईल व प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा दावाही करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात या वाहनाची मुंबई व दिल्ली विमानतळावर चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अशा प्रकारची ३८ वाहने चार वर्षांमध्ये या विमानतळांना पुरवण्यात येतील. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सप्टेंबर महिन्यापासून ३ महिन्यांची चाचणी घेण्यात येईल. त्यासाठी जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर या वाहनाची चाचणी शेवटच्या टप्प्यात आहे. एरोब्रिजपासून विमान धावपट्टीवर पोहोचेपर्यंत त्याच्या मुख्य इंजिनाचा वापर केला जाणार नसल्याने आवाज प्रदूषणामध्ये देखील ६० टक्क्यांपर्यंत घट होईल व इंधनाचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात कमी होईल. विमान धावपट्टीवर जाईपर्यंत सध्या लागणाºया इंधनाच्या ८५ टक्के बचत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.