मध्य मुंबईतील ‘इको’ गणेशा...
By Admin | Published: September 22, 2015 12:22 AM2015-09-22T00:22:59+5:302015-09-22T00:22:59+5:30
वाढत्या प्रदूषणामुळे गणेशभक्त यंदा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करीत आहेत. प्रत्येकजण ‘पर्यावरण संरक्षणाचा’ संदेश या उत्सवाच्या काळात देताना दिसत आहे
महेश चेमटे , मुंबई
वाढत्या प्रदूषणामुळे गणेशभक्त यंदा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करीत आहेत. प्रत्येकजण ‘पर्यावरण संरक्षणाचा’ संदेश या उत्सवाच्या काळात देताना दिसत आहे. शेतकऱ्याला दुष्काळाचे चटके बसत असतानाच मुंबईकर उत्सवाच्या माध्यमातून त्यांना आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी मदत करीत आहे. अशाच निवडक घरगुती आणि सार्वजनिक मंडळांचा ‘लोकमत’ने घेतलेला हा खास आढावा.
उत्सवाचे उत्सवपण जपणारे म्हणून परळची ओळख आहे. परळमधील वाकाणी हाऊस येथील म्हाडगुत कुटुंबाने १९५१ साली श्रीगणेशाला आपल्या घरी विराजमान केले. तेव्हापासून आजपर्यंत ही मूर्ती शाडूची ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे. आज त्यांची तिसरी पिढी पर्यावरणसंरक्षणाच्या ध्येयाने हा उत्सव साजरा करीत आहे. १० बाय १६ च्या घरात त्यांनी यंदा श्रींच्या देखाव्यासाठी पारंपरिक पद्धतीची संकल्पना निवडली. त्यानुसार सुशोभित केलेली हातगाडी, लेजीम खेळणारी तरुण- तरुणी अशा देखाव्याची प्रतिकृती साकारण्यात आली. त्याचप्रमाणे देखाव्यात थर्माकॉलचा वापर कटाक्षपणे टाळण्यात आला आहे. पूर्वी ज्याप्रमाणे हातगाडी सुशोभित करून गणपतीची मिरवणूक होत असे. तीच मिरवणूक परंपरा आजच्या काळात राबवण्यासाठी हा देखावा तयार करण्यात आला आहे. फुलांनी सजवलेली हातगाडी, सुबक अशी शाडूची मूर्ती, नऊवारी नेसून लेजीम खेळणाऱ्या तरुणी आणि फेटा घातलेल्या ताशांची ‘कतरी’ वाजवणारी मुले पाहताच नागरिकांच्या मनात जुन्या आठवणी ताज्या होतात. संदीप शेलार यांनी हा देखावा साकारला आहे.
शार्दूल म्हाडगूत याने याबाबत सांगितले, की टिळकांच्या नजरेतील उत्सव साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हल्ली उत्सवाचे इव्हेंट झाल्याने उत्सवातील गोडवा कमी झाला आहे. मुळात आज उत्सवाचा मूळ गाभा लक्षात घेऊन उत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे. उत्सवाच्या काळात पर्यावरणाची हानी न करता त्याचे संवर्धन तरुणांनी केले पाहिजे. त्याचप्रमाणे शहरातील ‘राजा’, ‘महाराजा’ म्हणून घेणाऱ्या मंडळाने खरेतर पारंपरिक मिरवणुकीचा आग्रह धरला पाहिजे, तर आणि तरच उत्सवाचे धार्मिक भावना जपण्यात मदत होईल.
दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि विभागातील नागरिक चौपाटीवर जाऊन समुद्राच्या पाण्याबरोबर पुन्हा किनारी वाहून आलेल्या मूर्तींचे विसर्जन करणार आहेत, असे मंडळाचे अध्यक्ष नाना आगवणे यांनी सांगितले.
आज कागदापासून श्रींची मूर्र्ती बनवण्यास ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे. पण सर्व मूर्तींमध्ये चर्चा आहे ती कोहिनूरच्या राजाची. दादर येथील नायगावमधील कोहिनूर मिल कंपाउंड येथे कागदाच्या लगद्यापासून ९ फुटी सिंहासनाधिष्ठित श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
१९८९ साली सुरुवात झालेल्या मंडळाने २००५ साली शाडूच्या मातीमध्ये मूर्ती आणण्यास सुरुवात केली. वृत्तपत्रे आणि त्यांच्या जोडणासाठी नैसर्गिक डिंक वापरून मूर्तीकार सतीश वळीवडेकर आणि भालचंद्र गाणार यांनी मूर्ती साकारली.
बाप्पासाठी रंग देताना आॅइल पेंटऐवजी अमेरिकन वॉटर बेस कलर या इकोफ्रेंडली रंगाचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान टाळ मृदुंगाच्या तालावर नाचणे त्यांना अधिक आवडते. त्याने ध्वनिप्रदूषणही होत नाही. महत्त्वाचे म्हणजे कोणतीही देणगी न स्वीकारता वर्षभर केलेल्या स्वबचतीमधून हा हा उत्सव साजरा केला जातो.