इको-सोलार सायकलचा शोध लावणारा ‘मुंबईकर रॅन्चो’
By admin | Published: December 25, 2015 02:46 AM2015-12-25T02:46:16+5:302015-12-25T02:46:16+5:30
भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात सौैरऊर्जेचा पुरेपूर वापर केला तर इंधनाची बचत आणि पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकते हे सिद्ध करून दाखवले आहे
मुंबई : भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात सौैरऊर्जेचा पुरेपूर वापर केला तर इंधनाची बचत आणि पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकते हे सिद्ध करून दाखवले आहे मुंबईच्या सतरा वर्षीय आहान पारेखने. इको-सोलार सायकलचा शोध लावून आहानने विज्ञान शोधात देशाचे नाव उंचावले आहे.
भारतातील मोठ्या शहरांमध्ये कामांसाठी अनेक लोक सायकलचा वापर करतात. यात प्रामुख्याने डिलिव्हरी बॉय, पेपर विक्रेते, भाजीवाले, चहावाले, डबेवाले यांचा समावेश आहे. यातील सगळ्यांनाच इंधनावर चालणारी मोटारसायकल परवडतेच असे नाही. सर्वसामान्यांची ही अडचण लक्षात घेत आहानने ‘इको-सोलार सायकल’चा शोध लावला. या सायकलवर सोलार पॅनल बसवण्यात आले असून ही सायकल उन्हात अवघ्या काहीच तासांमध्ये चार्ज करता येते. चार्ज करण्यासाठी सायकल एका ठिकाणी उभी करावी लागत नाही. सौर पॅनेलवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचे परिवर्तन ऊर्जेत होत राहते आणि ही सायकल चालत राहते. विशेष म्हणजे ऊन नसतानाही ही सायकल अगदी इतर सायकलींप्रमाणे चालवता येऊ शकते. त्यामुळे यापासून नुकसानही होत नाही. आहानने सोलार सायकलसाठी वापरलेले साहित्यही सहज उपलब्ध होणारे आहे. त्यामुळे या शोधाचा वापर अधिकाधिक लोकांना करता येणार आहे.