प्राध्यापकांना सोसावा लागत आहे भार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये अद्याप बंदच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’चा नारा देत कौशल्य विकासाला प्राधान्य दिले. कौशल्य विकास प्रभावीपणे राबविण्यासाठी अत्यंत हुशार अभियंत्यांची गरज आहे; मात्र, राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची सध्याची अवस्था बिकट आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये अद्यापही बंद असल्याने राज्यातील खासगी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना या वर्षांतील शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचा परिणाम महाविद्यालयांच्या कामकाजासह प्राध्यापकांच्या वेतनावरही होत असल्याची खंत अनेक शैक्षणिक संस्थाचालक व्यक्त करत आहेत.
अनेक व्यावसायिक विशेषतः अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थचक्र हे विद्यार्थ्यांकडून मिळणारे शुल्क व शिष्यवृत्तीच्या प्रतिपूर्तीवर अवलंबून असते. परंतु, यावर्षी कोरोनामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया लांबली. त्याचप्रमाणे प्रवेशित विद्यार्थ्यांनीही संपूर्ण शुल्क भरलेले नाही. त्यामुळे महाविद्यालयांवर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याची अथवा त्यात कपात करण्याची वेळ आली आहे. कपात केलेले वेतन कर्मचाऱ्यांना भविष्यात मिळणार आहे. मात्र, सध्या मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनात ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक साहित्यावर कराव्या लागणाऱ्या खर्चासह वैयक्तिक खर्चाचे गणित जुळविताना कसरत करावी लागत असून महाविद्यालयांबरोबरच कर्मचाऱ्यांचेही आर्थिक बजेट बिघडले आहे.
प्राध्यापकांची वणवण
राज्यातील अगदी नावाजलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांचा वेतनासाठी लढा सुरू आहे. अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांना गेले अनेक महिने संस्थांनी वेतन दिलेले नाही. कोरोनाचे कारण पुढे करणाऱ्या अनेक संस्था गेली अनेक वर्षे नियमित वेतन देत नाहीत. अनेक स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांना संस्थेकडून जेमतेम ५ ते १० हजार रुपये हातावर टेकवले जातात. तेही दरमहा नियमित मिळत नाहीत, असे एका प्राध्यापकांनी सांगितले. हक्काचे वेतन गमवावे लागेल म्हणून आहे ती नोकरी सोडता येत नाही आणि वेतनासाठी लढायचे तर कुटुंबाची गुजराण कशी करायची, अशा कोंडीत सध्या हजारो प्राध्यापक सापडले आहेत. काही प्राध्यापकांनी भाजीच्या दुकानांपासून, किराणा सामान घरपोच पोहोचविण्याचेही काम स्वीकारल्याचे सांगितले.
मुक्ताकडून ‘दिशा’ अभियान
वेतन मिळत नसल्यामुळे घर चालवणे कठीण झालेल्या प्राध्यापकांसाठी मुंबई युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन (मुक्ता) या संघटनेने ‘दिशा’ हे अभियान सुरू केले आहे. प्राध्यापकांना त्यांच्या कौशल्यानुसार काम मिळवून देण्यासाठी या अभियानात प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या तातडीने महाविद्यालयांमध्ये नव्याने नोकरी मिळण्यासारखी परिस्थिती नाही. अनेकांना सध्या घर चालवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे जिथे कामाची संधी आहे आणि प्राध्यापक ते करू शकतील, अशी कामे त्यांना मिळावीत यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी सध्या प्राध्यापकांची गूगल अर्जाच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात येत आहे. राज्यातील कुणीही प्राध्यापक त्यासाठी अर्ज करू शकतील, असे संघटनेचे वैभव नरवडे यांनी सांगितले.
.....
चौकट
जिल्हा - शासकीय अनुदानित - विनाअनुदानित- विद्यापीठ व्यवस्थापन (विना. अनु) -एकूण
मुंबई - १-५-...- ६
मुंबई उपनगर -१-१३-१-१५
एकूण - २-१८-१-२१