Join us

'कोचिंग क्लासेसशी तावडेंचे आर्थिक लागेबांधे'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 6:01 AM

कोचिंग क्लासेसचे मालक व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्यामुळेच खासगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार

मुंबई : कोचिंग क्लासेसचे मालक व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्यामुळेच खासगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली.सुरत येथे कोचिंग क्लासेसच्या इमारतीस भीषण आग लागून २० ते २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात १ लाख १० हजाराच्यावर कोचिंग क्लासेस आहेत. मुंबईत ३० ते ३५ हजार कोचिंग क्लासेस आहेत. पण त्यांचे फायर आॅडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. या क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाही. कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. सुरतसारखी घटना महाराष्ट्रात किंवा मुंबईत घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय शासनाकडे नाही, असेही देशमुख यांचे म्हणणे आहे.२०१७ मध्ये कोचिंग क्लासेस संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीवर विधानसभेत चर्चा झाली होती. १२ लोकांच्या समितीने हा मसुदा तयार केला होता. २०१८ ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठवला होता. परंतु ते अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर करु शकले नाहीत. तावडे यांनी लवकरात लवकर नवीन कायदा तयार करु असे आश्वासन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, असा आरोप देशमुख यांनी केला.>हे तर विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे भांडवल - तावडे२७ मे रोजी सुरतमध्ये घडलेली घटना अतिशय दुदैर्वी आहे. पण त्या घटनेचा संबंध नगर विकास खात्याच्या परवानगीशी आहे. शिक्षण विभागाचा काही संबंध नाही, हे पण माजी शिक्षणमंत्र्याला कळत नाही हे दुर्देवी आहे, असे प्रत्युत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.तावडे म्हणाले, अनिल देशमुख स्वत: शिक्षणमंत्री होते, त्यावेळी ते झोपा काढत होते का? आता त्यांना जाग आली. शिकवणी वर्गांसंदर्भात नियमांचा जो मसुदा तयार झाला त्यात जी सामान्य गृहिणी घरी शिकवणी घेते आणि जे गरीब विद्यार्थी शिकवण्या करुन आपले उच्च शिक्षण करतात ते भरडले गेले असते, म्हणून त्या मसुद्यात काही दुरुस्त्या करण्यात येत आहेत. क्लासवाल्यांकडून पैसे घेतले हे सिध्द करावे असे खुले आव्हानही तावडे यांनी दिले.